esakal | शिरूर : घरकुलांचा कार्यक्रम राबवावा, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन । Ajit Pawar
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

शिरूर : घरकुलांचा कार्यक्रम राबवावा, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरूर : ‘‘नगरपरिषदांनी विकासाची कामे करताना गोरगरीब जनतेसाठी ‘इकॉनॉमी लीगल सेक्‍शन’अंतर्गत शासकीय घरकुलांचा कार्यक्रम प्राधान्याने राबवावा. त्यामध्ये राज्य सरकार नगर परिषदांना सर्वतोपरी सहकार्य करील,’’ असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच, शिरूर शहर व परिसरातील विकासकामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली. शिरूर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष रवीबापू काळे उपस्थित होते.

हेही वाचा: अर्जदारावर दबाव आणल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

शिरूर ते वाघोली दरम्यानच्या फ्लायओव्हरमुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलेल व शिरूर शहर हे मराठवाड्याकडून मुंबईकडे येणारांचे प्रवेशद्वार होईल. त्यामुळे या कामाचा पाठपुरावा वेगाने चालू असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. शिरूर शहराच्या विकासासाठी दोन वर्षांत शंभर कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी स्वागत; तर सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी प्रास्ताविक केले. ‘नगर परिषदेच्या पुढील कार्यक्रमावेळी अजितदादांनी मुख्यमंत्री म्हणून यावे,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. नगरसेवक विजय दुगड यांनी सूत्रसंचालन केले. संतोष भंडारी यांनी आभार मानले.

‘कायदा हातात घेणाऱ्यांचा बीमोड करा’

‘‘काही ठिकाणी काही अविचारी तरुण कायदा हातात घेण्याचा, अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा तरुणांना आवरताना तो कुठल्या गटाचा, पक्षाचा किंवा कुणाच्या घरातील आहे, हे पाहू नका, त्याच्याविरुद्ध कडक ॲक्शन घ्या. एमआयडीसीतील चुकीची ठेकेदारी, वाळूमाफीया यांचा बंदोबस्त करा. दारूभट्ट्या किंवा वेगळे चुकीचे व्यवसाय कुणी करीत असेल; तर त्यांचा बीमोड करा,’’ अशी ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस दलाला दिली.

हेही वाचा: सोलापूर-माकणी रोडवर भीषण अपघात; महिला जागीच ठार

शिरूर येथील तरुण बांधकाम व्यावसायिक आदित्य संदीप चोपडा (वय २४) याच्या संशयास्पद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पवार यांना शहरातील अनेक संघटनांनी निवेदने दिली. हा हत्येचा प्रकार असून, हल्लेखोरांना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी त्यांच्याकडे केली. या दरम्यान, पवार यांनी आदित्यच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

आदित्य याचे वडील संदीप, आई छाया, बहिण दिशा व मामा मोहनलाल चंगेडिया व अतुल चंगेडिया यांनी अजित पवार यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. ‘दादा, तुम्ही माझ्या भावासारखे आहात, माझ्या एकुलत्या एका मुलाला आमच्यापासून हिरावून नेणाऱ्यांना सोडू नका,’ असा आर्त टाहो आदित्यच्या आईने फोडल्यावर पवार यांनाही गहिवरून आले. त्यांनी तातडीने नगरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील व पुण्याचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले.‘आज आदित्य गेला, पण पुढे अशा घटना होता कामा नये,’ असा सज्जड दम अजित पवार यांनी पोलिस दलाला दिला.

शिरूर नगर परिषदेने विकासाची वैविध्यपूर्ण कामे हाती घ्यावीत, त्यासाठी निधीची चिंता करू नये. अर्थमंत्री म्हणून मी विकासकामांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. शहरातील अंतर्गत रस्ते करताना पर्यावरण रक्षणावरही भर द्या. त्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा. पाणी पुरवठा योजनेतील सुधारणा, अंडरग्राऊंड ड्रेनेज, क्रीडा संकुल, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स किंवा अन्य विकासाच्या कामांचे नियोजन आजपासून करा. त्यासाठीच्या परवानग्या काढून ठेवा. टेंडर, इस्टिमेट करा. त्यासाठी डिसेंबर महिन्यातील अधिवेशनात पहिल्या टप्प्यात दहा कोटी व मार्चच्या अधिवेशनातील दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. अजित पवार म्हणाले.

loading image
go to top