सेवानिवृत्तीच्या वयाबाबत होऊ शकतो मोठा निर्णय; उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

मुंबईत वित्त विभागातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पुणे : वित्त विभागातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

येथील सरकारी विश्रामगृहात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकारी शिष्टमंडळाची पवार यांच्यासमवेत सेवानिवृत्ती वय ५८ वरून ६० करण्यासह इतर मागण्यांबाबत चर्चा झाली. सेवानिवृत्ती वय ६० करण्याबाबत त्यांनी महासंघाची भूमिका ऐकून घेतली.

मुंबईत वित्त विभागातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शिष्टमंडळामधे महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार  ग. दि. कुलथे, राज्य सरचिटणीस विनायक लहाडे, पुणे सरचिटणीस विठ्ठल वाघमारे, पुणे उपाध्यक्ष तुळशीदास आंधळे, राज्य संघटक विलास हांडे आदी उपस्थित होते.

'हिटमॅन' रोहित शर्मासह पाच खेळाडूंना 'खेलरत्न' जाहीर; पाहा संपूर्ण यादी!​

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा

विधानभवन सभागृहात जिल्ह्यातील 'कोविड व्यवस्थापन आणि नियोजना'बाबत आयोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पवार म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर, सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जनही साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी कोणीही गर्दी करु नये.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचे काम लवकरात लवकर सुरु होऊन गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. पुणे मेट्रोसह जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

खडकवासला प्रकल्पातून १६ हजार २४७ क्युसेकने विसर्ग; पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली!

रुग्णदर आणि मृत्यूदर नियंत्रणात ठेवा :
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णदर आणि मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी विशेष लक्ष द्यावे. पावसाळ्यातील साथीच्या आजाराच्या रुग्णांवरही वेळेत वैद्यकीय उपचार करण्याबाबत आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar assured that the state government would take a positive decision about retirement age