उपमुख्यमंत्र्यांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल; शहरातील परिस्थितीबाबत ठरवले जबाबदार!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

शहरात विकासकामे होत असताना ओढे नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह काही बांधकाम व्यावसायिकांनी अडवले आहेत. तसेच, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे ओढे-नाल्यांची पाणी वाहण्याची क्षमता कमी पडली.

पुणे : अतिवृष्टीमुळे शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असून, त्यांनी लक्ष देणे गरजेचे होते. ओढे-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह काही बांधकाम व्यावसायिकांनी अडवले आहेत, हेही त्यामागचे एक कारण आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे का केली नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. 

Bihar Election: डॉ. मसकूर उस्मानींना तिकीट मिळाल्याने खळबळ; काँग्रेसला घरचा आहेर​

कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत सद्यस्थिती आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (ता.१६) विधान भवन येथे बैठक घेण्यात आली. तसेच, पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आठ रुग्णवाहिकांचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार यांनी महापालिकेच्या कारभारावर तोफ डागली. 

पवार म्हणाले, शहरात विकासकामे होत असताना ओढे नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह काही बांधकाम व्यावसायिकांनी अडवले आहेत. तसेच, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे ओढे-नाल्यांची पाणी वाहण्याची क्षमता कमी पडली. अशा ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यास महापालिका कशामुळे विलंब करीत आहे. शहर असो किंवा ग्रामीण भागात कामे ही दर्जेदारच झाली पाहिजेत. महापालिकेच्या कामाचा आढावा घेणार आहोत, असे पवार त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारला पथक पाठवायचं असेल तर पाठवावं; अहवाल देण्याची उपमुख्यमंत्र्यांची तयारी​ 

हवामान खात्याने राज्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला होता, तो तंतोतंत खरा ठरला आहे. अजून दोन दिवस रेड अलर्ट असून, मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्‍यता आहे. पुणे विभागीय आयुक्‍त यांच्यासह संबंधित विभागांकडून परिस्थितीबाबत आढावा घेतला असून, संबंधितांना आवश्‍यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar criticizes the management of Pune Municipal Corporation