मोठी बातमी: अजित पवार यांनी पुणेकरांना दिलं नववर्षाचं गिफ्ट; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

1991 मध्ये पुणे शहराला 5 टीएमसी पाणी लागायचे. लोकसंख्या वाढली. आता 18 टीएमसी लागतेय. तेवढी गरज असल्याने तेवढा पाणी पुरवठा करावाच लागणार आहे. परंतु शेतीला पाणी कमी पडू लागले.

पुणे : "भामा आसखेड प्रकल्पातील पाणी पुर्नस्थापनसंदर्भात पुणे महापालिकेने राज्य सरकारला देय असलेले 260 कोटी माफ करू,' अशी घोषणा करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.1) पुणे महापालिका आणि पुणेकरांना नवीन वर्षांची भेट दिली. तसेच " राज्यात सरप्लस वीज आहे. त्यामुळे टाटाने मुळशी धरणातून होणारी वीज निर्मिती कमी करून पुणे, पिंपरी चिंचवडला पाणी कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करू,' असेही आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. 

नगररस्ता परिसरात पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भामा-आसखेड योजनेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार यांनी ही घोषणा केली. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, सर्व पक्षीय आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख , उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ उपस्थित होते. 

Video: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ; सभागृहाबाहेर कार्यकर्ते भिडले!​

पवार म्हणाले, "1991 मध्ये पुणे शहराला 5 टीएमसी पाणी लागायचे. लोकसंख्या वाढली. आता 18 टीएमसी लागतेय. तेवढी गरज असल्याने तेवढा पाणी पुरवठा करावाच लागणार आहे. परंतु शेतीला पाणी कमी पडू लागले. त्यामुळे भामा आसखेड योजनेत पाणी आणावे लागले.भामा आसखेड मधून पाणी उचलण्यापोटी राज्य सरकारने पुणे महापालिके कडे 260 कोटी मागितले आहे. मात्र या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने खूप खर्च केला आहे. त्यामुळे हे 260 कोटी रुपये माफ करावेत. यासाठी मी मंत्री मंडळात प्रयत्न करेन.'' 

भिडे आणि एकबोटेंवर रीतसर कारवाई करणार : गृहमंत्री​

फडणवीस म्हणाले," रोजगारामुळे स्थलांतर शहराच्या दिशेने होत आहे. हे अपरिहार्य आहे. शहर बकाल होणार नाही, यासाठी पाणी, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन यांचे नियोजन करण्यावर भर दिला पाहिजे. हे करत असताना शहर आणि ग्रामीण असा वाद होत असतो. तो टाळण्यासाठी शेतीसाठी प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून घ्यावे लागणार आहे. येत्या काळात उद्योगांना प्रक्रिया केलेले पाणी दिल्यास हा संघर्ष कमी होईल. पाणी ही निसर्गाची देणगी असली तरी ती इकॉनॉमिक कमोडिटी आहे.'' 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ही महत्वाकांक्षी योजना आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज यातून भागवली जाईल.'' महापौर मोहोळ यांनी प्रस्ताविक केले. तर सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. उपमहापौर शेंडगे यांनी आभार मानले. 

Video: 'औरंगाबादचं नामांतर हा भावनिक मुद्दा, काँग्रेस-शिवसेनेच्या वादात आम्हाला पडायचं नाही'

दादांचा टोला 
भाषणादरम्यान पवार यांनी वडगाव शेरीचे माजी आमदार यांचे नाव न घेता त्यांना टोला लगविला. ते म्हणाले, "या प्रकल्पामुळे काहीजणांच्या पोटात दुखत असेल. विशेषतः टॅंकर माफियांच्या पोटात गोळा आला असेल, कशाला हा उभारला प्रकल्प असे ते म्हणत असतील. चंदननगर, खराडी परिसरात कधी गेले की नागरिक म्हणायचे 'काही नको आम्हाला पाणी द्या.' पवार यांच्या सूचक वक्तव्याने सभागृहात कुजबूज वाढली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar gave a New Year gift to Pune Municipal Corporation and Pune citizens