बारामतीत राबविणार 'भिलवाडा पॅटर्न'; अजित पवार यांचे संकेत!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

बारामतीकरांनी स्वयंशिस्त पाळावी, घराबाहेर न पडता घरात राहून आपापली कामे करण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण रस्त्यावर कोणीही येऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

बारामती : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये ६ कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर आता बारामतीत 'भिलवाडा पॅटर्न' राबविण्यात येणार आहे, अशी माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये, त्याला त्वरीत आळा घालता यावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे भिलवाडा पॅटर्न?

राजस्थानमधील भिलवाडामध्ये ज्या प्रमाणे पूर्णपणे लॉकडाऊन करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच बारामतीत आता करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. बारामती शहरातील प्रत्येकाची घरोघर जाऊन तपासणी करणे, ही तपासणी किमान तीन वेळा करणे, या तपासणीसाठी वेगळी टीम काम करणार असून ज्या नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळतील, त्यांच्यावर विशेष लक्ष वैद्यकीय पथकांमार्फत दिले जाणार, सर्व जीवनाश्यक वस्तू लोकांनी दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षाही त्यांना घरपोच पुरविण्याची व्यवस्था करणे, अशा उपायांचा भिलवाडा पॅटर्नमध्ये समावेश आहे.

- Video : 'आपल्या भविष्यकाळाकडून...'; मुक्ता बर्वे काय सांगतेय ते बघाच!

बारामतीकरांनो, बाहेर पडू नका

बारामतीत लोकांनी अजिबात घराबाहेर पडू नये, असे आवाहन अजित पवार यांनी पुन्हा एकदा केले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात कोण आले होते, तसेच त्यांना कोणामुळे लागण झाली असावी, याचा शोध वेगाने सुरू आहे. हा आकडा वाढू नये, यासाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

- Good News : तब्बल ७६ दिवसांनी वुहानने घेतला मोकळा श्‍वास!

स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे...

बारामतीकरांनी स्वयंशिस्त पाळावी, घराबाहेर न पडता घरात राहून आपापली कामे करण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण रस्त्यावर कोणीही येऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. पोलिस प्रशासनावर विनाकारण ताण येऊ नये याची काळजी बारामतीकरांनी घेत प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंतीही पवार यांनी केली आहे. 

- Coronavirus: ही व्यक्ती करणार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची मदत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar to implement Bhilwara pattern in Baramati to control Coronavirus