Video : 'आपल्या भविष्यकाळाकडून...'; मुक्ता बर्वे काय सांगतेय ते बघाच!

Mukta-Barve
Mukta-Barve

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने युरोपीय देशांना नकोनकोसे करून सोडले आहे. इटली आणि स्पेन या दोन देशांना कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून जनजागृतीसाठी अफाट प्रयत्न केले जात आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्री नागरिकांना खबरदारी घेण्याबाबत आवाहनं करत आहेत. मात्र, मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेनं मंगळवारी (ता.८) सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमुळे अनेकांचे डोळे खाडकन उघडतील, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच भानावर येण्याचा इशारा मुक्ता वाचत असलेल्या या पत्रातून दिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला असून त्याची चर्चाही होत आहे.

प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री ह्या गेले तीन आठवडे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोम (इटलीची राजधानी) शहरात लॉकडाऊनमध्ये अडकल्या होत्या. तेव्हा त्यांनी सर्व युरोपीयन रहिवाश्यांना उद्देशून “फ्रॉम युअर फ्युचर” अर्थात ‘आपल्या भविष्यकाळाकडून’ या नावाचं एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र जगात अनेक वृत्तपत्रांमध्ये विविध भाषेतून प्रसिद्ध झाले आहे. या पत्रामध्ये त्यांनी येणाऱ्या काळात युरोपला कुठल्या भावनिक प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते, याची कल्पना दिली आहे किंवा याचे स्वानुभवावरून कथन केले आहे, असेही म्हणता येईल.
भारतातील कोरोनाची सद्य परिस्थिती लक्षात घेता या पत्रातील अनुभव हे आपल्या दृष्टीने ही तितकेच महत्वाचे आहेत.
   
मी हे पत्र तुम्हाला इटली मधून, म्हणजेच तुमच्या भविष्यकाळातून लिहीत आहे. आम्ही आता जिथे आहोत तिथेच काही दिवसांनी तुम्ही असणार आहात. कोरोना ची साथ ही सगळीकडे एका विशिष्ट पद्धतीने पसरत आहे, त्यामुळे तुमचा प्रवासही आमच्यासारखाच असणार आहे. 

कोरोना च्या विळख्यात, वेळेच्या बाबतीत आम्ही तुमच्या थोडं पुढे आहोत, जसं वुहान होतं आमच्या काही आठवडे पुढे. आम्ही तसंच वागलो जसं तुम्ही आत्ता वागताय. तुमच्याकडेही परिस्थितीचं गांभीर्य कळलेल्या व न कळलेल्या लोकांमध्ये वाद आहेत, जसे आमच्याकडे होते.एकीकडे सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे लोक आहेत आणि दुसरीकडे साधा फ्लू तर आहे, यात एवढी काळजी करण्याचं काय कारण आहे? असे म्हणणारे ही आहेत.पण लवकरच हेही वाद मागे पडतील आणि तुम्हा सगळ्यांचे आयुष्य एका नवीन वळणावर येऊन पोहोचेल. 

तुम्ही रोज घरामध्ये छान जेवण कराल, कारण तुम्हाला करण्यासारखं फारसं  काही नसेल. तुमच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा करावा यासाठी तुम्ही इंटरनेट वरून मार्गदर्शन घ्याल. वेगवेगळे छंद असलेल्या, आवडनिवड असलेल्या अनेक ऑनलाइन ग्रुप्स चा तुम्ही भाग व्हाल. सुरवातीला कुतूहल वाटणाऱ्या गोष्टींकडे नंतर मात्र तुम्ही ढुंकूनही पाहणार नाही. 

अनेक वर्ष तुमच्या कपाटात धूळ खात पडलेली जुनी, नावाजलेली पुस्तकं तुम्ही वाचायला काढाल, तुम्ही ते वाचायला सुरवात कराल पण लवकरच तुमचं मन त्यात ही रमणार नाही.    
तुम्ही पुन्हा जेवण कराल, पण या वेळेस तुम्हाला झोप लागणार नाही. आपल्या देशाचं, लोकांचं काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडेल. 

लॉकडाउन च्या आधी तुम्ही जेवढे व्यस्त होता, तेवढेच तुम्ही या ऑनलाइन सोशल लाइफ मध्ये व्यस्त रहाल.तुम्ही मेसेंजेर, व्हॉटसअप, स्काइप, झूम, अशा ऑनलाइन साइट्स, अॅपस् मोठ्या प्रमाणात वापराल.

तुम्ही वृद्ध असाल तर, तुमच्यापासून दूर असलेल्या तुमच्या मुलांची तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आठवण येईल. त्यांना पुन्हा कधी भेटता येईल,.. कदाचित पुन्हा भेट होईल की नाही अशा असंख्य विचारांनी तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. 
जुनी भांडणं, वादविवाद आता क्षुल्लक वाटायला लागतील. ज्या लोकांशी आयुष्यात पुन्हा कधीच बोलणार नाही अशी शपथ घेतली होती, त्यांची आपुलकीने चौकशी करण्यासाठी तुम्ही त्यांना फोन कराल. अनेक महिलांना घरी मारहाण सुरू होईल.

आपण निदान आपल्या घरात सुरक्षित आहोत पण ज्यांच्याकडे रहायला घरं नाहीत त्यांच काय? असा विचार तुम्ही कराल. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जातांना नेहमी वर्दळ असणारे रस्ते तुम्हाला निर्जन आणि भयावह वाटतील.त्यातून तुम्ही स्त्री असाल तर भीती आणखीनच जाणवेल.

संस्कृतींचा विनाश अश्याच गोष्टींमुळे होतो का? एवढ्या पटकन हे घडू शकतं का? कदाचित यालाच युगांत म्हणतात का? असे प्रश्न तुम्हाला भेडसावू लागतील. घरी परतल्यावर तुम्ही ह्या विचारांचं चक्र थांबवण्याचा प्रयत्न कराल आणि स्वतःला घरकामांमध्ये गुंतवून घ्याल. तब्येतीची काळजी म्हणून तुम्ही ऑनलाइन फिटनेस कोर्स शोधायला सुरवात कराल. 
तुम्ही अनेक गोष्टींवर हसाल, तुम्ही कुठल्याही गोष्टींवर हसाल, पोट दुखेपर्यंत हसाल, मात्र तुमच्या विनोदावर निराशेचं पांघरूण असेल. जे लोक कायम आयुष्याला गांभीर्याने बघत आले आहेत, ते सुद्धा जगण्याचा आणि जगाच्या निरर्थकतेवर पुनः एकदा गांभीर्याने विचार करतील. 

तुम्ही बाजारात जाण्याची तुमची वेळ तुमचा प्रियकर,तुमचे मित्र,तुमचे प्रियजन यांच्यासोबत ठरवाल. कारण त्या निमित्ताने तरी तुम्ही त्यांना प्रत्यक्षपणे जवळून पाहू शकाल, अर्थात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळूनच. 

अनावश्यक असलेल्या अनेक गोष्टींची जाणीव तुम्हाला होईल. 
तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा खरा स्वभाव तुम्हाला कळेल. गैरसमज दूर होऊन काही लोकांबद्दल खात्री वाटेल, काही लोकांचं आश्चर्य वाटेल.

प्रसिद्धीच्या झोतात असलेली अनेक मंडळी अचानक गायब होतील. त्यांच्यापैकी काही विद्वान वाटणारी मंडळी असंबद्ध वाटू लागतील. त्यांची मतं आता क्षुल्लक वाटू लागतील. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे युक्तिवाद मांडले जातील, परंतु त्यात सहानुभूतीचा अभाव असल्याने लोकं त्याकडे दुर्लक्ष करतील, आणि आधी ज्यांच्या मतांची खिल्ली उडवली गेली, ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, ती विश्वासपात्र वाटू लागतील.

काही लोकं या संपूर्ण परिस्थितीला एक नवा दृष्टिकोन देतील. ह्या सगळ्यामुळे पर्यावरणाला होणारे फायदे सांगतील. तुम्ही त्यांच्याशी एका क्षणाकरता सहमत देखील व्हाल, पण पुढच्याच क्षणाला तुम्हाला त्यांचा राग येईल. प्रदूषण कमी होतय ते सगळं ठीक आहे पण मी महिन्याचा खर्च कसा भागवू, बिलं कशी भरू हे विचार तुम्हाला सतावतील. 

एका नव्याने सुरू होणाऱ्या पर्वाचे तुम्ही साक्षीदार होत आहात, या गोष्टीचा आनंद साजरा करावा की दु:ख हेच तुम्हाला कळणार नाही. तुम्ही तुमच्या खिडक्यांमध्ये, अंगणांमध्ये, गच्चीवर येऊन गाणी गाल. जेव्हा तुम्ही आम्हाला बाल्कनी मध्ये गाणी गातांना पाहिलं, तेव्हा तुम्ही विचार केला असेल की काय लोकं आहेत. पण आम्हाला माहितीये की तुम्ही सुद्धा एकमेकांना उभारी देण्यासाठी गाणी गाल आणि तेव्हा तुम्हाला आम्ही असे का गात होतो याची जाणीव होईल. 

तुमच्यापैकी अनेक जण लॉक डाऊन संपलं की घटस्फोटाचा अर्ज करतील,अनेक जण विभक्त होतील. अनेक स्त्रिया गरोदर राहतील. तुमच्या मुलांच्या शाळा बहुदा ऑनलाइन होतील. सतत घरी असलेल्या मुलांमुळे तुमच्या डोक्याचा ताप वाढेल, पण हा अनुभव ही आनंददायी असेल. घरातील वयस्कर मंडळी अधिक हट्टी होतील. बाहेर गेल्याने त्यांना संसर्ग होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे तुम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न कराल, पण ते तुमच्यावरचं संतापतील. 

ह्या महामारीचा संसर्ग होऊन मरण पावलेल्या लोकांचा, त्यांच्या अंत्यविधीचा विचार टाळण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न कराल.  
हा संसर्ग थांबवण्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे तुम्हाला मनापासून कौतुक करावेसे वाटेल. त्यांच्याबद्दलचा आदर अनेक पटीने वाढेल. 

सर्वांचा मिळून एक सुर निर्माण होईल, शेवटी माणुसकी हा एकच खरा धर्म आहे. आपण सगळे एकाच नावेचे प्रवासी आहोत. काही अंशी हे खरं पण असेल. तुम्ही देखील फक्त स्वत:पुरता मर्यादित विचार करणं सोडून तुम्ही सुद्धा समाजाचा एक घटक आहात असा विचार करू लागाल.

मात्र खऱ्या आयुष्यात आर्थिक परिस्थितीमुळे खूप फरक पडेल. सुंदर बगिचा असलेल्या आलिशान बंगल्यात राहणं आणि दाटीवाटी असलेल्या चाळीत राहणं यात  नक्कीच फरक असेल. फक्त घरून काम करावं लागणं आणि लॉकडाउन मुळे काम बंद होणं, नोकरी गमावणं हे देखील नक्कीच सारखं नसेल. “एकाच नावेचे प्रवासी”, हे म्हणणं जितकं सोपं आहे, तितकीच प्रत्यक्ष परिस्थिती अवघड आहे. कारण ही नाव सर्वांसाठी एकसारखी नाही, नसेल, किंवा कधी नव्हतीच.  

एका क्षणाला तुमच्या लक्षात येईल की हे सगळं खूप अवघड आहे. तुम्हाला या परिस्थितीची भीती वाटू लागेल.
कदाचित ही भीती तुम्ही जवळच्या लोकांजवळ व्यक्त कराल, कदाचित त्यांना उगीच ताण कशाला, हा विचार करून अव्यक्त राहणंच पसंत कराल.

आम्ही इटलीत आहोत. हेच आहे तुमचं भविष्य आणि आमचा वर्तमान. आमच्याकडे काही दूरदृष्टि नाही. तुम्हाला जे आत्तापर्यंत सांगितलं ते आमच्या अनुभवाचे बोल आहेत. त्याहून थोडा पुढच्या भविष्याचा विचार केला, तर ते तुमच्यासारखचं आम्हालाही माहित नाही. आम्ही आत्ता फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकतो की जेव्हा हे सगळं संपेल, तेव्हा जग फार वेगळं असेल.    

मूळ लेखिका : फ्रान्सेसका मेलँड्री. 
© Francesco Gattoni - www.francescogattoni.com
अनुवाद : क्षमा देशपांडे, विराज मुनोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com