पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करा; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

पोलिसांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीवर भर द्यावा. पोलिसांना एन-95 मास्क व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन द्यावीत.

पुणे : कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्यू दर पाहता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच, कोणत्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (ता.१८) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुण्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारकडून लागेल ती मदत देण्यास तयार आहोत. पोलीस प्रशासनाने कडक धोरण अवलंबवावे. त्यासाठी आठ दिवस कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यात येईल. ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

- ...आणि तेलतुंबडे प्रकरणाबाबत प्रकाश आंबेडकरांना घ्यावी लागली ही भूमिका

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालण्यात यावेत. या भागातील  नागरिकांना वारंवार ये- जा करता येणार नाही. त्याचबरोबर या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि परिसरात स्वच्छतेची विशेष दक्षता घ्यावी. येथील नागरिकांना फ्ल्यू सदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. रॅपिड टेस्टमार्फत संभाव्य रुग्ण शोधण्यावर भर द्यावा. हॉटस्पॉट असणाऱ्या ग्रामीण भागातही कडक निर्बंध अवलंबवावे लागणार आहेत. कोल्हापूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आलेल्या ॲपच्या धर्तीवर पुण्यातही असा उपक्रम राबवावा.

- मोठी बातमी : दीड लाख ऊसतोड कामगार मूळगावी परतणार; राज्य सरकारची परवानगी!

पोलिसांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीवर भर द्यावा. पोलिसांना एन-95 मास्क व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन द्यावीत. शहर आणि ग्रामीण भागातील मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरु करावेत. यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. रेशन दुकानांव्दारे व्यवस्थित धान्य वितरित करण्यात यावे. कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहता कामा नये.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. त्यासाठी मार्केट कमिट्या, सहकारी संस्थांनी अर्थसहाय्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

शैक्षणिकदृष्टया विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्राचार्यांना संस्थेत उपस्थित राहण्यासाठी परवानगी द्यावी, अशी सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले. तसेच कोविड -19 सेवा देणाऱ्या खासगी रुग्णालयांना सरकारने मदत करावी, अशी सूचना राज्यमंत्र्यांनी केली.

- Coronavirus : सर्व्हेसाठी आलेल्या टीमवर हल्ला; इंदूरमधील दुसरी घटना

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवडचे
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar orderd for enforced lockdown strictly in Pune and Pimpri Chinchwad