Coronavirus : सर्व्हेसाठी आलेल्या टीमवर हल्ला; इंदूरमधील दुसरी घटना

Corona-Medical-Staff
Corona-Medical-Staff

इंदूर : मध्यप्रदेशमधील इंदूर शहरात कोरोना व्हायरसने थैमान घालण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय पथकावर (मेडिकल टीम) दगडफेक करण्याचा प्रकार घडला आहे. तसेच टीममधील सदस्यांचे मोबाईलचेही नुकसान केले आहे. पलसिया पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या विनोबा नगर परिसरात ही घटना घडली. मेडिकल टीमला अचानक अशा भयानक प्रकाराला सामोरे जावे लागल्यानंतर त्यांनी पलसिया पोलिस ठाणे गाठले. 

दगडफेक झाल्यानंतर मेडिकल टीमच्या बचावासाठी पुढे आलेल्यांवर आरोपी पारसने चाकूहल्ला केला. आणि टीममधील एका सदस्याच्या मोबाईलचे नुकसान केले. या मेडिकल टीममध्ये डॉक्टर, शिक्षक, वैद्यकीय कर्मचारी आणि आशा कार्यकर्ता यांचा समावेश होता. हल्ला झाल्यानंतर सर्व आरोग्य कर्मचारी यांनी पलसिया पोलिस ठाणे गाठले. सर्व्हे प्रमुख असलेल्या डॉ. प्रवीण चौरे यांनी दगडफेक करणारा आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल्याची माहिती दिली आहे. 

पोलिस निरीक्षक विनोदी दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना विनोबानगर परिसरात घडली. पारस यादव या स्थानिक रहिवाशाने मेडिकल टीमवर हल्ला केला. काही कारणांवरून त्याचे शेजाऱ्यांशी भांडण सुरू होते. त्यावेळी तेथे आलेल्या मेडिकल टीममधील एकाने सर्व्हेच्या कामासाठी आपला मोबाईल बाहेर काढला. त्यावेळी पारसला सदर व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करत आहे, असे वाटले. त्यामुळे त्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत पारसने तो तोडून टाकला. बेकायदेशीरपणे दारू विकण्याचे आरोपही पारसवर आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली घटनास्थळी धाव
सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. पलसिया पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी मेडिकल टीमशी संवाद साधला. 

दरम्यान, मेडिकल टीमवर हल्ला झाल्याचे वृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहे. टीममध्ये सामील असलेल्या डॉक्टरांनी आमच्यावर दगडफेक झाल्याचे सांगितल्यानंतरही यास त्यांनी असहमती दर्शविली आहे.

इंदूरचे डीआयजी हरिनारायण चारी मिश्रा यांनी म्हटले आहे की, पारसचे शेजाऱ्यांशी पहिल्यापासून भांडण होते. मेडिकल टीम त्या ठिकाणी गेली त्यावेळीही त्याचे शेजाऱ्यांशी भांडण सुरू होते. सर्व्हेसाठी एकाने आपला मोबाईल बाहेर काढल्याचे पाहिल्यानंतर व्हिडिओ शूट होत असल्याचा संशय आल्याने पारसने मोबाईलचे नुकसान केले. त्याव्यतिरिक्त टीमवर कोणताही हल्ला करण्यात आला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com