esakal | '...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit-Pawar

ठराविक बांधकाम व्यावसायिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा विषय स्थायी समिती समोर मांडण्यात आला आहे. बहुमताच्या जोरावर तो मान्य करण्याची तयारी भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. ​

'...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'शहरातील सर्वच सहा आणि साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरून बांधकाम करण्यास परवानगी द्या. त्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्या,' अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.६) महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्या. 'अन्यथा राज्य सरकारला हस्तक्षेप करावा लागेल,' असा इशाराही यावेळी त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दिला. 

- शिवभक्तांनो, राजगडावरील देवीच्या मंदिराचे पहा काय झाले, तोरण्यावरही...

पुणे शहरातील सहा आणि साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे कलम 210 अन्वये रुंदीकरण दर्शवून त्या ठिकाणी टीडीआर वापरून बांधकाम परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर मांडला आहे. या प्रस्तावावरून महापालिकेतील सत्ताधारी विरोधात महाआघाडी असा वाद सुरू झाला आहे. पालकमंत्री अजित पवार आज पुण्यात आले होते. त्यावेळी आमदार चेतन तुपे,सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी पवार यांची भेट घेतली. 

- लाल महालात कसा साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा; वाचा सविस्तर!

ठराविक बांधकाम व्यावसायिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा विषय स्थायी समिती समोर मांडण्यात आला आहे. बहुमताच्या जोरावर तो मान्य करण्याची तयारी भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची शक्‍यता आहे. ठराविक रस्त्यांऐवजी संपूर्ण शहरात त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पवार यांच्याकडे केली. त्यावेळी पवार यांनी या सूचना दिल्या.

- पुणे- नाशिक रेल्वेबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले पाहा!

ठराविक रस्त्यांवर परवानगी देण्याऐवजी शहरातील सर्वच रस्त्यांवर त्यांची अंमलबजावणी करावी. त्यासाठी महापालिकेतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा. कोणत्या फायद्यासाठी हा निर्णय न घेता शहराच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घ्यावा. तरीदेखील महापालिकेने हा निर्णय घेतला नाही, तर सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करेल, असा इशाराही यावेळी पवार यांनी दिला. 

पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. या प्रस्तावात पालकमंत्र्यांनीच हस्तक्षेप केल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image