esakal | मुळशीतील ज्येष्ठ संचालक अकार्यक्षम
sakal

बोलून बातमी शोधा

राजेंद्र हगवणे

"मुळशीतील ज्येष्ठ संचालक अकार्यक्षम"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पौड : ‘‘जिल्हा बँक व दूध संघावरील अकार्यक्षम आणि वयोवृद्ध संचालकांमुळे मुळशी तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून जनविकास रखडला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुळशीकरांनी पक्षनिष्ठा असलेल्या नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांनाच संधी द्या,’’ असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांनी केले.

हेही वाचा: अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन जणांना सहा महिन्यासाठी तडीपार

कोळवण (ता. मुळशी) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन, महिलांना पीठ गिरणी वाटपाच्या कार्यक्रमात घेतलेल्या मेळाव्यात हगवणे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अजित पवार यांच्या जिवावर मोठे झालेले बॅंकेचे संचालक स्वार्थापोटी शिवसेनेत गेले. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवार यांच्या विरोधात उघडपणे काम केले. आता राष्ट्रवादीला चांगले दिवस आल्यानंतर पुन्हा संधी साधू पाहत आहेत. अशा दलबदलू, स्वार्थी आणि घरभेदीपणा करणाऱ्या संचालकांना घरी पाठवा. सर्वसामान्यांच्या विकासाचे धोरण असलेल्या सहकारात तरुणाईला संधी द्या.’’

या वेळी महादेव कोंढरे म्हणाले, ‘‘सहकारात पक्षाच्या चिन्हांपेक्षा निष्ठा आणि तळमळीच्या विचारावर पॅनेल तयार होतो. अजित पवार, सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांचे पक्षनिष्ठा असलेले संचालक तालुक्यातून पाठवायचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे घड्याळ आणि शरद पवार यांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.’’

हेही वाचा: पुणे : तिसऱ्या लाटेची तयारी, जम्बोला मान्यता

या वेळी सविता दगडे, सुनील चांदेरे, नीलेश पाडाळे, विलास अमराळे, प्रवीण धनवे, माउली साठे, बबनराव धिडे यांचीही भाषणे झाली. युवक राष्ट्रवादीच्यावतीने ७२ महिलांना पन्नास टक्के सवलतीत पीठगिरण्या वाटप केल्या. अंकुश टेमघरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पांडुरंग ओझरकर, कोमल वाशिवले, वैशाली गोपालघरे, पोपट दुडे, दगडूकाका करंजावणे, अंकुश मोरे, पोपट दुडे, भगवान नाकती, विठ्ठल पडवळ, लहू चव्हाण, काळूराम आखाडे, भरत सातपुते, ज्ञानोबा मांडेकर, अशोक साठे, संतोष साठे आदी उपस्थित होते.

loading image
go to top