'हे डांबरीकरण किती दिवस टिकणार?'; डांबरीकरणावरून दिघीकर संतप्त!

Dighi-Road
Dighi-Road

भोसरी (पुणे) : दिघीत पावसानंतर ओल्या रस्त्यावर डांबरीकरण केल्याने हे डांबरीकरण किती दिवस टिकणार याबद्दल दिघीकरांद्वारे शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे डांबरीकरण करून नागरिकांच्या पैशाचा अपव्यय केल्याचाही आरोप दिघीकरांद्वारे करण्यात येत आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे पुकारण्यात आलेल्या लॅाकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून रस्त्याच्या डागडुजीची कामे बंद होती. रस्त्यावरील खड्डे मुरुमाने भरले तर ते पावसात टिकणार नाहीत म्हणून रस्त्याची डागडूजी पाऊस थांबल्यावर डांबरीकरणाने केल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे देण्यात आली.

मंगळावारी (ता. ७) दिघीत दुपारी एकच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. तासभर जोरदार पाऊस झाल्यावर पावसाने उघडीप दिली. त्यानंतर पावसाची भूरभूर सुरू होती. पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर महापालिकेद्वारे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र पावसानंतर ओल्या झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण का केले असा प्रश्न दिघीकरांद्वारे उपस्थित  करण्यात येत आहे.  या विषयी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की मंगळवारपासून (ता. ७) ते गुरुवारपर्यंत (ता. ९) कोरोना व्हायरसच्या संसर्गाची शृंखला खंडीत कण्यासाठी शंभर टक्के बंद पाळण्यात आला आहे.

या बंदमुळे दिघी परिसरातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ होणार नसल्याकारणाने रस्त्याच्या डागडुजीसह रस्त्यावरील पॅच डांबरीकरणाने भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लागणारे सर्व साहित्य मागविण्यात आले.  मात्र दुपारी अचानक पावसाला सुरूवात झाल्याने काम थांबवावे लागले. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतरच रस्त्याच्या डागडूगीसह रस्त्यावरील पॅच डांबरीकरणाने बुजविण्यात आले. मात्र हे पॅच योग्य पद्धतीने बुजविण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे.

महापालिकेने पावसानंतर झालेल्या ओल्या रस्त्यावरच डांबरीकरण केल्याने हे डांबरीकरण किती काळ टिकेल यात शंका आहे. त्यामुळे ओल्या रस्त्यावर डांबरीकरण करत महापालिकेने नागरिकांच्या पैशाचा अपव्यय केला आहे. त्याचप्रमाणे या बीबीएमचे (डांबरासहीत खडी) तापमान १२० अंश सेल्सिअसपर्यंत असणे गरजेचे असताना या ठिकाणी बीबीएमचे तापमान ९० अंश सेल्शिअस होते. त्यामुळे रस्त्याचे करण्यात आलेले हे डांबरीकरण मोठ्या पावसात टिकणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांनी संबंधितांवर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.
- संतोष वाळके, शिवसेना दिघी विभागप्रमुख

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिघीतील कृष्णानगरमधील रस्त्याच्या डांबराकरणास मूळ जागा मालकांचा विरोध असल्याने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गेल्या सात-आठ वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लॅाकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यापासून कामे बंद होती. त्यामुळे या रस्त्यावर डागडुजीसाठी रस्त्यावरील मोठ्या पॅचच्या डांबरीकरणासह इतर रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. पावसानंतर डांबरीकरणाचे प्लांट बंद होतात. रस्त्यावरील खड्डे मुरूम-मातीने भरल्यास पावसात ते टिकत नसल्याने खड्डे व पॅचचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीबीएमच्या वरच्या थराचे तापमान कमी तर आतील थराचे तापमान अधिक असते.
- राजेंद्र शिंदे, उपअभियंता, स्थापत्य विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com