पालिकेकडून मिळणाऱ्या सुविधांबाबत साडेसतरानळी ग्रामस्थांचा भ्रमनिरास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेकडून मिळणाऱ्या सुविधा
पालिकेकडून मिळणाऱ्या सुविधांबाबत साडेसतरानळी ग्रामस्थांचा भ्रमनिरास

पालिकेकडून मिळणाऱ्या सुविधांबाबत साडेसतरानळी ग्रामस्थांचा भ्रमनिरास

हडपसर : अपुरे पाणी, उखडलेले रस्ते आणि वारंवार तुंबून वाहणारे ड्रेनेज अशी परिस्थिती आहे साडेतीन वर्षापूर्वी पालिकेत समाविष्ट झालेल्या साडेसतरानळी गावची. ना माननियांचे लक्ष ना पालिका प्रशासनाचे. दाद मागायची तरी कुणाकडे, असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी केला आहे.पालिकेत समाविष्ट होताना सुमारे पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या साडेसतरानळी गावची लोकसंख्या आता पंचवीस हजारांवर गेली आहे. ग्रामपंचायत असताना ज्या प्राथमिक सुविधा पुरविल्या जात होत्या, त्यामध्ये पालिकेत समावेश होऊनही काहिही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. सध्या गावची दररोज सुमारे पंधरा लाख लीटर पाण्याची मागणी असतानाही केवळ तीन-साडेतीन लाख लीटरच पाणी मिळत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना सध्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

हेही वाचा: अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

वाढत्या नागरिकरणामुळे ड्रेनेजवर क्षमतेपेक्षा अधिक बोजा वाढल्याने ते वारंवार तुंबले जात आहे. त्यामुळे चेंबरमधून उघड्यावर पाणी वाहत असते. त्यातून दुर्गंधी निर्माण होत आहे. अनेक नागरिकांनी पाटबंधारेच्या वितरिकेमध्ये सांडपाणी सोडले आहे. सर्व्हे क्रमांक २०३ मधील सर्व सांडपाणी जुन्या ड्रेनेज वाहिनीतून येत आहे. त्याची क्षमता आता कमी पडत आहे. या सर्व वाहिन्या बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.परिसरातील अमनोराकडून येणाऱ्या मुख्य पाईपलाईन रस्त्यासह साधूनाना वस्तीकडे येणारा रस्ता, रेल्वेलाईनकडे जाणारा मुख्य रस्ता व इतर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मागणी करूनही त्याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. या ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यांमुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे वारंवार अपघातसदृष्य परिस्थिती निर्माण होत आहे.

पालिकेत समावेश होऊनही गेल्या तीन-साडेतीन वर्षात पालिकेने प्राथमिक सुविधा पुरविण्यात काहीही बदल केलेला नाही. ग्रामपंचायतने दिलेल्या सुविधांवरच येथील कारभार सुरू आहे. लोकसंख्या वाढूनही तेवढेच पाणी मिळत आहे. रस्ते, ड्रेनेजही तेच आहेत. किमान स्वच्छ व पुरेसे पाणी तरी मिळेल असे वाटले होते, पण तेही नाही. मग पालिकेत जाऊन आमचा फायदा काय झाला, हेच कळत नाही. लोकप्रतिनिधीही याबाबत काहीच भूमिका घेत नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा: MPSC : कोर्टाच्या सुनावणीचे कारण देत पुन्हा ४१६ उमेदवारांच्या नियुक्तीस दिरंगाई

"गेली चार वर्षांपासून आम्ही पुरेशा पाण्याची मागणी करीत आहोत. मात्र, अद्यापही पाणी मिळालेले नाही. खराडी भागाला आता भामा असखेडचे पाणी मिळाले आहे. त्यामुळे मगरपट्टा परिसरातून खराडीला गेलेल्या पूर्वीच्या जलवाहिनीतून साडेसतरानळीला पाणी मिळावे. केशवनगरला याच वाहिनीतून पाणी दिलेले आहे. त्यापध्दतीने साडेसतरानळीला पाणी द्यावे.'

- संदीप तुपे, माजी सरपंच, साडेसतरानळी

"आवश्यक निधीची तरतूद झाली नसल्याने साडेसतरानळी येथील अनेक कामे प्रतिक्षेत आहेत. रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज याबाबत त्या त्या विभागाच्या अभियंत्यांशी बोलून तात्पुरत्या स्वरूपात प्रश्न सोडविण्यात येत आहेत. नागरिकांनी अशी काही अडचण असल्यास सांगावे, त्यावर तात्काळ उपाययोजना केली जाईल.'

-प्रसाद काटकर

Web Title: Disillusionment Of The Sadesataranali Villagers About The Facilities Provided By The Municipality

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsHadapsar