esakal | ‘डीएलएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher

‘डीएलएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ

sakal_logo
By
- मीनाक्षी गुरव

पुणे - शिक्षण (Education) घेऊन ना नोकरीची हमी अन् शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (TET) आणि शिक्षक अभियोग्यता चाचणीची वेळखाऊ अनिश्चित प्रक्रिया... अशा विविध कारणांमुळे विद्यार्थी आता ‘शिक्षक होणे अन् शिक्षकाची (Teacher) नोकरी नको रे बाबा’ असे म्हणत आहेत. म्हणूनच आता शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘डीएलएड’ (DLED) अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहेत.

पूर्वीचे डी.एड. आता डीएलएड (डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन) या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यात हा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. परंतु, गेल्या पाच वर्षांत या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असल्याने वास्तव आहे. परिणामी, राज्यातील महाविद्यालये झपाट्याने बंद होत आहेत. एकेकाळी शिक्षक होण्याचे स्वप्नं उराशी बाळगून हजारो विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे (तत्कालीन डी.एड.) वळत होते. त्या वेळी नोकरीची हमी मिळत होती. परंतु, गेल्या दहा-बारा वर्षांपासून शिक्षकभरतीची प्रक्रिया ठप्प झाली होती. दरम्यान, हा अभ्यासक्रम पूर्ण झालेले लाखो उमेदवार (भावी शिक्षक) बेरोजगारीची झळ सोसत आहेत. अशात शिक्षकभरती प्रक्रिया सुरू झाली असली, तरीही ती मर्यादित जागांसाठी असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची ही परवड डोळ्यांसमोर असल्याने विद्यार्थी आता ‘डीएलएड’ अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवू लागल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: SPPU : अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी हवा धोरणात्मक निर्णय

डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर म्हणाले की, डीएलएड अभ्यासक्रम पूर्ण केला, तरी नोकरीची हमी नसणे, हे या अभ्यासक्रमाला पाठ फिरविण्यामागील प्रमुख कारण आहे. त्या तुलनेत बी.एड. अभ्यासक्रम केल्यास प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये नोकरीची शक्यता अधिक असते.

महाविद्यालये कमी करा

काही वर्षांपूर्वी विशेषत: ग्रामीण भागात शिक्षक होण्याचे स्वप्नं पाहून अनेकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतु, गेल्या १०-१२ वर्षांपासून शिक्षकभरती बंद असल्याने बारावीनंतरचा हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. अभ्यासक्रम पूर्ण करून काही उपयोग नाही. त्यामुळे आता पदविका अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे, असे मत बीड येथील शिक्षकभरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवार अर्चना सानप यांनी सांगितले.

हेही वाचा: लष्कराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली; टपाल कर्मचाऱ्याला अटक

काय आहेत कारणे...

  • शिक्षकभरतीत दिरंगाई

  • मर्यादित पदे आणि भरतीप्रक्रियेवरील मर्यादा

  • शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची वेळखाऊ प्रक्रिया

  • लाखोंनी असणारे बेरोजगार शिक्षक

  • खासगी संस्थांच्या शाळांमधील डोनेशनची पद्धती

  • शिक्षण घेऊन नोकरीची हमी नसणे

शिक्षकभरती होत नसल्याने, तसेच सरकारच्या उदासीनतेमुळे किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थी ‘डीएलएड’ अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवत आहेत का?, आपली प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअॅपवर नावासह पाठवा.

- ८४८४९७३६०२

loading image
go to top