कोरोना लशीचा रक्ताच्या गुठळीशी संबंध नाही; वाचा कारणे आणि उपाय

astrazenca
astrazenca
Updated on

भारतात आतापर्यंत ४ कोटी नागरिकांना लस मिळाली असली तरी अनेक गैरसमजामुळे लसीकरणाला वेग आलेला नाही. त्यातच युरोपमधील काही देशांमध्ये ऑक्‍सफर्ड/ऍस्ट्रा-झेनेकाच्या लसीमुळे काही जणांना रक्ताच्या गुठळ्या झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्याचा परिमाण भारतामधील लसीकरणावर झाला. लस घेतल्याने खरेच रक्ताच्या गुठळ्या होतात का? गुठळ्या होण्यामागे काही दुसरेच कारण असते? याचा घेतलेला आढावा.

जानेवारी २०२१ पासून जगभरातील अनेक देशांत कोरोना संसर्गावर विविध कंपन्यांचे लसीकरण सुरू झाले. मात्र, सुरुवातीपासूनच अनेक देशांत लशींबद्दल अनेक गैरसमज पसरले. भारतही त्याला अपवाद नाही. साहजिकच लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाही. भारतात आतापर्यंत जवळपास ४ कोटी नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्‍सिन आणि ऑक्‍सफर्ड/ऍस्ट्रा-झेनेका/सिरमची कोविशिल्ड अशा दोन लशींचा त्यात समावेश आहे. लस घेतल्यानंतर साधारण त्रास होत असल्याच्या तक्रारी होत होत्याच. आता युरोपमध्ये लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने लसीकरणाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, भारतामध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीला अशा प्रकारचा त्रास झाला नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही.

रक्ताच्या गुठळ्या (ब्लड क्‍लॉटस्‌) म्हणजे काय?
रक्ताची गुठळी होणे म्हणजे द्रवरूपातील रक्त जेलसारखे किंवा घनस्वरूपात बदलणे. रक्ताचे क्‍लोटिंग ही एक आवश्‍यक प्रक्रिया आहे, जी आपल्याला काही घटनांमध्ये जास्त रक्त गमावण्यापासून प्रतिबंधित करते. जसे की आपण जखमी झाल्यावर, आपला एखादा अवयव कापल्यानंतर किंवा अपघात झाल्यावर काही वेळातच जखमेतील रक्त घनस्वरूपात बदलते. त्यामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात होणार रक्तस्राव थांबतो. काही कारणांमुळे जेव्हा एखादी रक्ताची गुठळी आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये बनते तेव्हा ती नेहमीच विरघळत नाही. ती एक अतिशय धोकादायक आणि अगदी जीवघेणी परिस्थिती असू शकते. अशा प्रकारची रक्ताची छोटी गुठळी आपल्या रक्तवाहिन्यांमधून आपले हृदय आणि फुप्फुसांपर्यंत प्रवास करते. तिथे ती अडकून बसू शकते आणि रक्तप्रवाह रोखू शकतो. ही एक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असते.

रक्ताची गुठळी का होते?
रक्ताची गुठळी होण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपले वय. विशेषतः जर आपण ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल, काही वेळा लांब प्रवास करत असाल, बेडवर काही दिवस पडून राहावे लागल्यास किंवा बराच काळ आळशी राहिल्यास गुठळी होण्याचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा, गर्भधारणा, धूम्रपान, कर्करोग, काही गर्भ निरोधक गोळ्या आदींसारख्या कारणांमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. काही वेळेला रक्ताच्या गुठळ्या होणे कौटुंबिक इतिहासही असतो. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे तो हस्तांतरित होतो. सहसा थंडीच्या दिवसांत ज्येष्ठ नागरिकांमध्ये असा प्रकार दिसून येतो.

रक्ताची गुठळी होण्याला लस कारणीभूत आहे का?
सध्या तरी वरील प्रश्‍नाचे उत्तर नाही असेच आहे. गेल्या आठवड्यात युरोपमधील काही देशांत वृद्धांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झालेल्या आढळल्या. सर्वात आधी नॉर्वे देशात अशा काही नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ज्यांना लस दिली गेली होती आणि त्यांना रक्ताच्या गुठळ्या झालेल्या आढळल्या. त्यानंतर लगेचच डेन्मार्क, जर्मनी, आयर्लंड आदी युरोपियन देशांत तसे काही ज्येष्ठ नागरिक आढळून आले आणि त्यामुळेच युरोपमधील आठपेक्षा अधिक देशांनी ऑक्‍सफर्ड/ऍस्ट्रा-झेनेकाच्या लसींचे लसीकरण तात्पुरते थांबवले. युकेमध्येसुद्धा जवळपास २ कोटी व्यक्तींना आतापर्यंत ऑक्‍सफर्ड/ऍस्ट्रा-झेनेकाच्या लसीचे डोस मिळाले आहेत. त्यांपैकी १३ जणांमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसली. साधारणपणे प्रत्येक एक हजार ज्येष्ठ नागरिकांपैकी एक व्यक्तीला असा आजार होतो. लसीमुळे असा आजार होत असेल तर डॉक्‍टरांच्या अंदाजानुसार एकट्या युकेमध्ये कमीत कमी २० हजार व्यक्तींना आणि संपूर्ण युरोपमध्ये ५० हजार जणांना अशा प्रकारचा त्रास व्हायला हवा होता. भारतामध्येसुद्धा जवळपास ५० हजार नागरिकांना रक्ताच्या गुठळ्यांची समस्या जाणवायला हवी होती. मात्र, युकेमध्ये फक्त १३ जणांना ऑक्‍सफर्ड/ऍस्ट्रा-झेनेकाची आणि १५ व्यक्तींना फायझर कंपनीची लस घेतल्यावर असा त्रास जाणवला. संपूर्ण युरोपमध्ये ३० व्यक्तींना आणि भारतामध्ये अजून एकालाही असा त्रास जाणवलेला नाही.

युरोपमध्ये ऑक्‍सफर्ड/ऍस्ट्रा-झेनेका लसीची आजची काय स्थिती आहे?
युरोपियन देशांची युरोपियन मेडिकल एजन्सी (ईएमए) आणि युकेची मेडिसिन आणि हेल्थकेअर प्रॉडक्‍ट रेग्युलेटरी (एमएचआरए) यांनी लगेचच अशा कारणांचा अभयास केला आणि त्यांनी जाहीर केले की कोणत्याही लसीमुळे लोकांना रक्ताची गुठळी झाली नाही याची करणे वेगळी असून त्यामध्ये वय, धूम्रपान आणि इतर पूर्वीचे आजार यांचा समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी युरोपमधील सर्वच देशांनी पुन्हा ऑक्‍सफर्ड/ऍस्ट्रा-झेनेका लसीचे लसीकरण सुरू केले आहे. भारतामध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीला अशा प्रकारचा त्रास झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? त्याची लक्षणे काय असतात?
तरुणांमध्ये रक्ताची गुठळी होण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे, धूम्रपान-सिगारेट. वृद्धांना उतारवयामुळे असा त्रास होतो. लस घेतल्यानंतर लगेचच किंवा काही दिवसांत अचानक श्‍वास लागणे, श्‍वास घेताना छातीवर दाब येणे, पाहण्यात किंवा बोलण्यात अडचण येणे आदी काही त्रास जाणवला तर लगेच डॉक्‍टरांशी संपर्क साधा. सोनोग्राफी करून अशा त्रासाचे लगेचच प्राथमिक निदान करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com