esakal | परदेशांतील सहली रद्द करण्याची घाई नको 
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशांतील सहली रद्द करण्याची घाई नको 

उन्हाळ्याच्या सुटीत परदेशात फिरायला जाण्याचे नियोजन आपण डिसेंबर, जानेवारीपासून ते अगदी मार्च-एप्रिलपर्यंत करतो; पण चीनसह जगातील ३३ देशांमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला, त्यामुळे परदेशातील सहलीचे बुकिंग रद्द करावे की करू नये, अशा द्विधा मनःस्थितीत बहुतांश पर्यटक अडकले आहेत.

परदेशांतील सहली रद्द करण्याची घाई नको 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - परदेशातील सहलीचा प्लॅन केलाय नं! आता कोरोनाच्या भीतीमुळे तो रद्द करण्याची घाई करू नका. तुम्ही जिथे फिरायला जाणार आहात, तेथील कोरोनाच्या उद्रेकाचे चित्र एप्रिलच्या मध्यापर्यंत स्पष्ट होईल, त्याप्रमाणे केंद्र सरकार धोरण निश्‍चित करेल. त्या आधारावर तुम्हाला योग्य निर्णय घेणे सोपे होईल. त्यामुळे आता ठरवलेली सहल रद्द तर करू नकाच; पण इतर पर्यटकांनी देशांतर्गत पर्यटनाच्या पर्यायाचाही विचार करावा, असे मत पर्यटन व्यवसायातील कंपन्यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उन्हाळ्याच्या सुटीत परदेशात फिरायला जाण्याचे नियोजन आपण डिसेंबर, जानेवारीपासून ते अगदी मार्च-एप्रिलपर्यंत करतो; पण चीनसह जगातील ३३ देशांमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला, त्यामुळे परदेशातील सहलीचे बुकिंग रद्द करावे की करू नये, अशा द्विधा मनःस्थितीत बहुतांश पर्यटक अडकले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पर्यटन व्यवसायातील कंपन्यांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्या वेळी या कंपन्यांनी हा विश्‍वास व्यक्त केला. 

भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे संचालक सुनील गोळे म्हणाले, ‘‘पर्यटकांनी परदेशातील सहलीचे बुकिंग रद्द करण्याची घाई करू नये. जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकार कोरोनाबाबत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. केंद्राने दिलेल्या सूचनांप्रमाणे सहलीचा निर्णय तुम्हाला घेता येईल, त्यासाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागेल.’’ 

गिरिकंद ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापकीय संचालक अखिलेश जोशी म्हणाले, ‘‘तुम्ही बुकिंग केलेल्या सहलीची काळजी करू नका. कारण, प्रत्येक देशाचे आरोग्य खाते आणि पर्यटन विभाग कोरोनाच्या उद्रेकावर लक्ष ठेवून आहे. हाँगकाँगसारख्या काही देशांमध्ये भारतातील प्रवाशांची ये-जा बंद केली आहे. पण, जगातील उर्वरित देश पर्यटनासाठी पूर्णतः सुरक्षित आहेत.’’ 

हेही वाचा  : राज्यात उन्हाचा ताप वाढणार

विहार ट्रॅव्हल्सचे संचालक ऋषिकेश पुजारी म्हणाले, ‘‘कोरोनाच्या उद्रेकाचा दोन महिन्यानंतरच्या स्थितीचा आढावा घेऊन अगदीच सहलीला जाता आले नाही, तरीही केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे विमान तिकीट आणि हॉटेलच्या तिकिटांचा परतावा पर्यटकांना मिळू शकतो.’’ 

युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भूतान, नेपाळ हे देश पर्यटनासाठी आजही पूर्णतः सुरक्षित आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कॅप्टन नीलेश गायकवाड म्हणाले, ‘‘ही आंतरराष्ट्रीय आपत्ती आहे. अशा वेळी पर्यटकांनी कोरोनाचा उद्रेक झालेल्या देशात न जाणे योग्य. त्यामुळे तेथील व्यवस्थेवरही ताण येणार नाही. तसेच, भारतात होणाऱ्या संसर्गाचाही धोका कमी होईल. पर्यटकांसाठी देशांतर्गत पर्यटनाचाही मार्ग खुला आहे.’’

आज अशास्त्रीय माहिती समाज माध्यमातून, व्हॉट्‌सॲपवरून व्हायरल होत आहे. त्यातून बऱ्याच लोकांनी चिकन किंवा मांस खाणे सोडले. अनेक लोक परदेशातील सहलींचा फेरविचार करू लागले. आकडेवारी पाहिली तर कोरोनाचा संसर्ग जगात सर्वत्र झालेला नाही. तसेच, त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण खूप जास्त आहे, हे लक्षात येईल. व्हॉट्‌सॲपवरील पोस्टकडे दुर्लक्ष केले, तर गैरसमज नक्कीच दूर होतील. 
- मिलिंद बाबर, व्यवस्थापकीय संचालक, मॅंगो हॉलिडेज

loading image