पुन्हा लॉकडाउन नकोच! व्यापाऱ्यांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 February 2021

कोरोना पुन्हा वाढत असल्याने सध्या सर्वत्र पुन्हा  लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोरोना वाढला तर लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनच्या भीतीने व्यावसायिक, कामगार, नागरिक धास्तावले आहेत.

मार्केट यार्ड - कोरोना पुन्हा वाढत असल्याने सध्या सर्वत्र पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोरोना वाढला तर लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनच्या भीतीने व्यावसायिक, कामगार, नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे सरकारने काही निर्बंध घालावेत. मात्र, पुन्हा लॉकडाउन करू नये, अशी भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी मांडली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरवातीच्या लॉकडाउनने व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा लॉकडाउन झाले तर व्यापाऱ्यांची हानी होईल. या सगळ्यामुळे व्यापार संपून जाईल. कोरोना कमी करण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. लॉकडाउन केल्यास व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असेल.
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) 

लॉकडाउनने दुकाने बंद ठेवावी लागतात. त्यामुळे शिल्लक असलेल्या मालाचा साठा खराब होतो. अनेक व्यावसायिकांनी व्यापार बंद केला आहे. पुन्हा लॉकडाउन केल्यास व्यापार संपेल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. परंतु लॉकडाउन परत नको.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर

हॉटेल की बेकायदा धंद्याचं कोठार! पुणे-सोलापूर हायवेवरील लॉजवर पोलिसांचा छापा

आधीच नागरिक मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. लॉकडाउन काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे कर्जाचे हप्ते जात नाहीत. नागरिकांची सहनशक्ती संपलेली आहे. आता कुठे सर्व पूर्व पदावर यायला सुरवात झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन करू नये.
- अमोल घुले, उपाध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन

सुरवातीच्या लॉकडाउनमुळे काय भोगले, हे सगळ्यांना माहिती आहे. कामगार गेले, नोकऱ्या गेल्या. ऑफिसेस बंद झाले. सामान्य नागरिकांची गैरसोय झाले. व्यवसाय उद्धस्त झाले आहेत. सरकारने लॉकडाउन न करता, गर्दी कशी कमी करता येईल, हे पहावे. 
- अजित बोरा, व्यापारी, मार्केट यार्ड 

Video : 'झुलवा पाळणा...पाळणा, बाळ शिवाजीचा...'; शिवजयंतीनिमित्त नंदी सिस्टर्सची म्युझिकल ट्रीट

व्यापारी आता लॉकडाउन स्वीकारणार नाहीत. ते नाराज आहेत. आधीच संपूर्ण व्यवसाय विस्कळित झाला आहे. चारही बाजूने व्यापार अडचणीत आहे. आमचा व्यवसाय अत्यावश्यक सेवेत येत असला तरी सरकारने अनेक निर्बंध आणले होते.
- विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन

सुरवातीच्या लॉकडाउनने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचे चटके प्रत्येकाला बसलेले आहेत. अनेकजण त्यातून अजूनही उभारी घेऊ शकलेले नाहीत. सध्या व्यवसाय तोट्यात आहेत.  त्यामुळे सरकारने पुन्हा लॉकडाउन करून, व्यावसायिकांना अडचणीत आणू नये.
- वालचंद संचेती, अध्यक्ष, दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स

व्यापारी सध्या कोरोनाची पूर्ण काळजी घेत आहेत. त्यासंदर्भात पुन्हा त्यांना सूचना केल्या आहेत. लॉकडाउन परवडणारे नाही. आधीच व्यापारी अडचणीत आहेत. त्यामुळे सरकारने पुन्हा लॉकडाउन करू नये.
- महेंद्र पितळीया, सचिव -पुणे व्यापारी महासंघ

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont expect a lockdown again pune Merchant