
नदीपात्रातील व नदीलगतच्या शेतातील अवैध वाळूउपसा झालेल्या ठिकाणाचा पंचनामा करून दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदार यांचेकडे अहवाल पाठविला आहे.
डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे मागील आठ दिवसांपासून कऱ्हा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा होत असताना महसूल व पोलिस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबतचे वृत्त 'सकाळ'च्या (ता. १३) अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल प्रशासनाच्या वतीने तातडीने दखल घेण्यात आली. आज तलाठी गजानन पारवे, पोलिस पाटील नवनाथ मदने, कोतवाल ज्ञानदेव मदने व सरपंच पांडूरंग सलवदे यांनी कऱ्हा नदीपात्रातील व नदीलगतच्या शेतातील अवैध वाळूउपसा झालेल्या ठिकाणाचा पंचनामा करून दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदार यांचेकडे अहवाल पाठविला आहे.
पुणेकरांच्या खिशाला कात्री; का होतेय पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ?
मागील आठ दिवसांपासून वाळूमाफियांनी रात्रीच्या वेळी खुलेआम मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू केलेला होता. वाळूउपशामुळे परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसेच नदीच्या पलीकडे असणाऱ्या काळोखे गंधारे वस्ती या ठिकाणी जाणारी पाईपलाईन नदीपात्रामध्ये या वाळूच्या अवजड वाहनांमुळे तुटलेली आहे. त्यामुळे सदर वस्तीवरील नागरीकांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. वाळू व्यावसायिक आपली वाहने ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये येऊ नये यासाठी गावातील अंतर्गत रस्त्याचा वापर करून गावाबाहेर वाळूची वाहतूक करीत होते.
त्यामुळे गावठाण अंतर्गत नुकत्याच झालेल्या नवीन रस्त्यांची देखील यामुळे खराबी होत होती. अवैध वाळूउपसा होत असल्याबाबत माहिती असतानाही महसूल, पोलिस व स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असताना 'सकाळ'ने याबाबत आवाज उठवला. त्याबाबत नागरिकांनी 'सकाळ'चे कौतुक केले. नदी पात्रातील व पात्रालगच्या खासगी शेतजमीनीतील वाळू ही सरकारी मालमत्ता आहे. ती विनापरवाना काढण्याचा कोणालाही अधिकार नाही. डोर्लेवाडी येथील अवैध वाळूउपशाचा रीतसर पंचनामा केला असून, दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी अहवाल पाठवण्यात येईल असे तलाठी गजानन पारवे यांनी सांगितले.
आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही
पदाधिकाऱ्यांनी घेतली वाळूचोरी रोखण्याची जबाबदारी-काल 'सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आज ग्रामपंचायत व स्थानिक पदाधिकारी यांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात मिटिंगचे आयोजन केले होते. यामध्ये वाळू व्यवसायिक व नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांना बोलावून आजपासून अवैध वाळूउपसा कायमचा बंद करणे बाबत समज देण्यात आली आहे. शिवाय तसे निदर्शनास आले तर त्याच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने गुन्हा दाखल करावा असा सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)