उद्योगनगरीत महामानवास सामूहिक मानवंदना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त महिलांनी मेणबत्त्या पेटवून अभिवादन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त महिलांनी मेणबत्त्या पेटवून अभिवादन केले.

पिंपरी - भारतीय राज्यघटनेने शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक भीमसैनिकांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यानिमित्त भीमसृष्टी शिल्प परिसरात अभिवादन सभा, सामूहिक मानवंदना असे उपक्रम राबविले, तर शाळांमध्ये ‘अरे सागरा भीम माझा इथे निजला शांत हो जरा’, अशा भीमगीतातून विद्यार्थ्यांसमोर जीवनपट मांडला.

सामूहिक मानवंदना 
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभा घेतली. त्यानंतर अनुयायांनी सामूहिक मानवंदना दिली. या वेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, श्रीरंग सरपाते, उमेश बनसोडे, निळकंठ तागतोडे, वीरेंद्र गायकवाड, सिद्धार्थ वानखेडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, सौरभ शिंदे, युवराज ढोरे उपस्थित होते.

‘पी. के.’मध्ये अभिवादन 
पिंपळे गुरव येथील पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जगन्नाथ काटे, दीपाली जुगुळकर, संगीता पराळे, सविता आंबेकर उपस्थित होते. सुनीता मजूकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रज्ञा गायकवाड यांनी आभार मानले. 

भीमगीतांतून मानवंदना 
चिखली- शरदनगर येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू महाराज विद्यालयात भीमगीतांचे आयोजन केले होते. डॉ. आंबेडकर यांचे जीवनचरित्र गायनातून विद्यार्थ्यांसमोर मांडले. गायन धम्म बांधव संघाचे अध्यक्ष अनंत पवार यांनी केले. मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे (हार्मोनिअम), जनार्दन हुसळे, विकास म्हस्के, संतोष घरडे, सचिन कांबळे (ढोलकी) यांनी साथसंगत केली. या वेळी बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकूळ गायकवाड, लहू कांबळे, मुख्याध्यापक बाबाजी शिंदे उपस्थित होते. रूपाली पवार यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता जोगदंड यांनी आभार मानले. 

दापोडीत प्रवचन
दापोडीतील धम्मचक्र प्रवर्तन महाविहारात धम्मचारी ऋताईन यांचा जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण भोसले, सरचिटणीस सचिन खरात, कार्याध्यक्ष साईनाथ कांबळे यांनी अभिवादन केले. अमोल कांबळे, दीपक देवडे, शाहीद अत्तार, मयूर भुजबळ उपस्थित होते.

रहाटणीत अभिवादन
रहाटणीतील न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, राजेश गायकवाड उपस्थित होते. मेघा भट यांनी सूत्रसंचालन केले. अनुराग यादव यांनी आभार मानले.

भोसरीत विविध उपक्रम
भोसरी - महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्धविहार आणि विविध सामाजिक संघटनांद्वारे अभिवादन करण्यात आले. संत तुकारामनगरातील धम्मदूत मैत्री संघ बुद्धविहारात धम्ममित्र जमदाडे यांचे प्रवचन झाले. या वेळी आर. एस. धंदर, दीपमाला वानखेडे, उषा शेलार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुषमा सरदार यांनी केले. जया वानखेडे यांनी आभार मानले.

इंद्रायणीनगरातील बुद्धविहारात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. बुद्धविहाराचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, संतोष मोरे, विशाल रोकडे, कार्तिक गजभिये उपस्थित होते. दिलीप काटे व महादेव बाविस्कर यांनी डॉ. आंबेडकरांविषयीची माहिती सांगितली. नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, गिरीश वाघमारे, दिलीप काकडे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समितीचे विशाल जाधव, सुरेश गायकवाड, आनंदा कुदळे, महात्मा फुले समता परिषदेचे ॲड. चंद्रशेखर भुजबळ, काळूराम गायकवाड, विष्णू मांजरे, लक्ष्मण मुदळे, प्रताप गुरव आदींनी भीमसृष्टीमधील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. स्मॉल अँड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र जकाते यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. महेश लोंढे, शशिकांत डांगे, मदन जोशी आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. भोसरी, दिघी परिसरातील बुद्धविहारात डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.

पिंपळे गुरवमध्ये बुद्ध वंदना
पिंपरी - पिंपळे गुरव येथील विहारात सिद्धार्थ सेवा संघ व यशोधरा महिला संघाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी माया कांबळे, इंदुमती खरात, अलका गायकवाड व रंगूबाई शेलार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. या वेळी बौद्धाचार्य बाळासाहेब कडाळे, दिलीप कांबळे, सोपानराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. महालिंग काळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता डोळस यांनी आभार मानले. श्‍यामसुंदर क्षीरसागर, बौद्धाचार्य पांडुरंग कांबळे, निवृत्ती थोरात, उत्तम कांबळे, पोलिस पाटील तुषार कांबळे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

वडगावात अभिवादन
वडगाव मावळ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मावळ तालुका बहुजन समाज पार्टीच्या वतीने येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवसभरात शेकडो कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. बसपाच्या वतीने येथील महसूल भवनाच्या प्रांगणात अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता. जिल्हा सचिव प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तालुकाध्यक्ष दिनेश ससाणे, शिवसेनेचे विभागप्रमुख अनिल ओव्हाळ, प्रमोद खंदारे, सिद्धार्थ जगताप, प्रमोद भालेराव, बाळासाहेब ओव्हाळ, नितीन सोनवणे, सुरेश गायकवाड, सुशीला गायकवाड, संजीवनी जगताप आदी उपस्थित होते. प्रकाश गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला. 

देहूरोड येथे अभिवादन
देहू - देहू आणि देहूरोड परिसरात विविध संघटना आणि संस्थांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमी येथे बुद्धविहार कृती समिती व धम्मभूमी सुरक्षा समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष टेक्‍सास गायकवाड, अशोकराव गायकवाड, मंदाकिनी भोसले, रंजना सोनवणे, सिंधू तंतरपाळे, डी. पी. भोसले, हिरापुत्र भवार उपस्थित होते. सव्हाना चौकात फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर, धर्मपाल तंतरपाळे, सुदाम तरस, यदुनाथ डाखोरे, विजय पवार, अजय बखारिया, सुनील गडहिरे, श्‍याम भोसले, व्यंकटेश कोळी, रमेश जाधव उपस्थित होते.

देहूरोड पोलिस ठाण्यात पोलिसांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाच्या वतीने सुभाष चौकात अभिवादन सभेचे आयोजन केले होते. जिल्हाध्यक्षा शिना छाजेड, रुबिना शेख, वर्षा गायकवाड, अमित छाजेड, सुभाष बंसल उपस्थित होते.

इंदोरीत पूजन
इंदोरी - येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका हेमलता खेडकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थी मनीष शिरसाट, ओंकार साळुंके व शिक्षक सिद्धेश्‍वर सोनवणे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याबाबत माहिती दिली. विद्यार्थी बिशू रावत याने आभार मानले.

आठवणींना उजाळा
टाकवे बुद्रुक - बुद्धविहारात त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. जनसेवा सेवा तरुण मंडळ आणि ग्रामस्थांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रमेश साबळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी अनेक मान्यवरांनी आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com