बंगल्यासाठी डीएसकेंच्या ६ वर्षीय नातवाची न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

बंगल्याची जागा डीएसके यांनी 1996 मध्ये विकत घेतली होती. त्यानंतर आवश्‍यक असलेल्या कायदेशीर परवानग्या घेऊन तेथे 2006 साली बंगला बांधण्यात आला.

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतून बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांचा चतुःशृंगी येथील निवासी बंगला वगळण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज शुक्रवारी (ता.25) न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. डीएसके यांच्या सहा वर्षीय नातवाने हा विनंती अर्ज केला आहे.

मानलं पठ्ठ्याला; आर्थिक अडचणीतही पैलवानांच्या मदतीला आला धावून!​

विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. संबंधित बंगला हा डिसेंबर 2016 मध्ये गिफ्ट डीडद्वारे (बक्षीसपत्र) नातू दक्ष शिरीष कुलकर्णी याच्या नावावर करण्यात आलेला आहे. अल्पवयीन मुलाच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करता येत नाही. त्यामुळे जप्तीतून तो वगळण्यात यावा, असे या अर्जात नमूद करण्यात आल्याचे डीएसके यांचे वकील ऍड. आशिष पाटणकर, ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांनी सांगितले. डीएसके यांचा चतुःशृंगी येथे 40 हजार चौरस फूट बांधकाम असलेला 'सप्तशृंगी' हा बंगला आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जप्त करण्यात आला आहे. मात्र त्याच्या जप्तीवर बचाव पक्षाने आक्षेप घेतला आहे.

महिलांनो, रस्त्याने पायी फिरत असाल तर सावधान; सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या!​

बंगल्याचे बांधकाम गुन्ह्याशी संबंधित पैशातून नाही :
बंगल्याची जागा डीएसके यांनी 1996 मध्ये विकत घेतली होती. त्यानंतर आवश्‍यक असलेल्या कायदेशीर परवानग्या घेऊन तेथे 2006 साली बंगला बांधण्यात आला. डीएसके यांच्यावर दाखल असलेले गुन्हे 2006 नंतर घडले आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 2017 मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याशी संबंधित पैशांमधून हा बंगला घेण्यात आलेला नाही. तसेच हा बंगला आता सहा वर्षीय नातवाच्या नावावर आहे. त्यामुळे कायद्यानुसार या बंगल्याचा समावेश जप्त मालमत्ता सूचीमध्ये येणार नाही, असे ऍड. राजोपाध्ये यांनी सांगितले.

केंद्राच्या विरोधात अजितदादाही मैदानात; कृषी विधेयकावर घेतली परखड भूमिका​

यापूर्वी चार महागडी वाहने लिलावातून वगळली :
डीएसके यांची चार महागडी वाहने यापूर्वी लिलावातून वगळण्यात आली आहेत. स्थगिती दिलेल्या वाहनांमध्ये दोन बीएमडब्ल्यू, एक पोर्शे आणि टोयोटा कंपनीच्या एका वाहनाचा समावेश आहे. लिलाव करण्यात येत असलेली तेरापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे ती विकण्यात येऊ नये, असा अर्ज बचाव पक्षाकडून तीन फेब्रुवारी रोजी करण्यात आला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DSKs six year old grandson filed application in court about residential Bungalow