महिलांनो, रस्त्याने पायी फिरत असाल तर सावधान; सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

शहरात काही दिवसांपासून पायी जाणाऱ्या किंवा दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दुचाकीवरुन किंवा पायी येणाऱ्या चोरट्यांकडून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाईल हिसकावून नेण्याच्या घटना घडत आहेत.

पुणे : शहरात सोनसाखळी आणि मोबाईल चोरटे सक्रीय झाले असून त्यांच्याकडून सध्या पायी फिरणाऱ्या महिलांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्याकडून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे जबरदस्तीने हिसकावून घेण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. गुरूवारी (ता.24) सायंकाळी विश्रांतवाडी आणि कोंढवा बुद्रुक येथे पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. 

केंद्राच्या विरोधात अजितदादाही मैदानात; कृषी विधेयकावर घेतली परखड भूमिका​

विश्रांतवाडी येथे राहणारी 24 वर्षीय महिला विश्रांतवाडी येथील भाजी मार्केटमधून 24 सप्टेंबरला सायंकाळी पावणे सात वाजता त्यांच्या सासूसोबत भाजीपाला घेऊन येत होत्या. त्या त्यांच्या घराकडे जाण्यासाठी बिस्मील्ला चिकन सेंटर समोरुन जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसका मारून जबरदस्तीने चोरुन नेले. त्यांनी याविषयी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोंढवा बुद्रुक येथे राहणाऱ्या 38 वर्षीय महिला गुरूवारी सायंकाळी सहा वाजता कोंढवा बुद्रुक येथील सोमजी चौकाकडून शीतल पेट्रोल पंपाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने जात होत्या. त्यानंतर त्या तालाब मस्जिदजवळ आल्यानंतर तेथून रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसका मारून चोरुन नेली. 

मानलं पठ्ठ्याला; आर्थिक अडचणीतही पैलवानांच्या मदतीला आला धावून!​

शहरात काही दिवसांपासून पायी जाणाऱ्या किंवा दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दुचाकीवरुन किंवा पायी येणाऱ्या चोरट्यांकडून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाईल हिसकावून नेण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच बाणेर रोडवर दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणीच्या हातातील दोन मोबाईल चोरट्यांनी चोरुन नेले होतेत. तसेच औंधमध्ये पेट्रोल पंपावर थांबलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रकार घडला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incidents of gold chain snatching and mobile theft are rises in Pune city