
पुणे : जुन्नर तालुक्यात चक्रीवादळामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज पुरठवा बंद पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ठप्प झाला आहे.
जुन्नर : जुन्नर व तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागात वादळी वाऱ्यामुळे काल रात्रीपासून वीज गेली असून, त्यामुळे पिण्याचे पाणी पुरवठा करणे शक्य झाले नाही. आज वीज व नेट नसल्याने पोस्ट, बँक पतसंस्थांमधील कामकाज ठप्प झाले होते. शासकीय कार्यालयात तुरळक गर्दी होती. तालुक्यात सर्वत्र पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. रस्त्याच्या कडेला असणारी मोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. शाळा, आरोग्य केंद्र, घर व गोठा, कांदा चाळीवरील पत्रे कौल उडून गेल्याने नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी घरात ठेवलेले धान्य भिजून गेले आहे. शेतातील बाजरी व अन्य पिके भुईसपाट झाली. आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस आलेला झाडाच्या कैऱ्या गळून गेल्या आहेत. आदिवासी भागात पावसाचा व वाऱ्याचा जोर अधिक असल्याने या भागात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यातील नऊ मंडल विभागातील नऊ पर्जन्यमापन केंद्रावर आज सकाळी आठपर्यंत एकूण ४९२ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाची केंद्रनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे : जुन्नर- ६०, नारायणगाव- ४७, ओतूर- ३२, वडगाव आनंद- २४, बेल्हे- २०, निमगाव सावा- ३०, डिंगोरे- १०६, आपटाळे- ७५, राजूर- ९८.
नारायणगाव : परिसरात काल दुपारी झालेल्या चक्री वादळामुळे नारायणगाव, वारुळवाडी, येडगाव परिसरातील सुमारे पंचवीस घरे व गोठ्याचे पत्रे उडून गेले. डोक्यावर वीट पडल्याने पाटे मळा येथील झुंबराबाई पाटे या ज्येष्ठ महिला व वारुळवाडी येथील चंद्रकांत गुंजाळ हे जखमी झाले. त्यांच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळपासून शेती पिकांच्या व मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत, अशी माहिती गाव कामगार तलाठी नितीन सोनवणे व तालुका कृषी अधिकारी सतिश शिरसाठ यांनी दिली.
आळेफाटा : परिसरात काल वादळीवाऱ्यामुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, डाळिंब, शेवगा, आंबे, कांदा, ऊस, बाजरी, चारा पिके आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पारगावतर्फे आळे येथील सोमनाथ डुकरे यांच्या अडीच एकर क्षेत्रावरील जवळपास एक हजार शेवग्याची झाडे उन्मळून पडल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. आळेफाटा परिसरातील वडगाव आनंद, आळेफाटा, आळे, राजुरी, बेल्हे, आणे, साकोरी, पारगावतर्फे आळे, निमगाव सावा आदी परिसरातील शेतकऱ्यांना वादळी वाऱ्याचा फटका बसला. निमगाव सावा येथील सोपान श्रीपती गाडगे यांच्या व नळावणे येथील बाबाजी शिंदे यांच्या डाळिंब बागेचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. बेल्हे येथील खोमणेमळा परिसरात डॉ. मनोहर खोमणे यांच्या केळी पिकाचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. माजी सरपंच विश्वनाथ डावखर यांचे मक्याचे पीकही भुईसपाट झाले. जाधववाडी (बोरी बुद्रुक) येथील दिलीप दगडू नरवडे यांच्या केळी पिकालाही वादळी वाऱ्याचा फटका बसला. मंगरुळ परिसरातील संजय निवृत्ती मनसुख, नवनाथ केशव लामखडे, नीलेश काशिनाथ लामखडे, रामभाऊ बबन कोरडे, नामदेव देवजी नवले, सुदाम दगडू चौधरी यांच्या पाॅलीहाउसवरील प्लास्टिक पेपर वादळीवाऱ्यामुळे फाटल्याने संबंधितांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने नुकसान झाले. काही ठिकाणी आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या. तसेच, फळझाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले. दरम्यान, कांदा झाकण्यासाठी प्लास्टिक कागद व शेडनेट कापड खरेदीसाठी शेतकऱ्यांनी दुकानांमध्ये गर्दी केली.
आपटाळे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागाला काल झालेल्या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. आंब्याचे आगर समजल्या जाणाऱ्या मीना नदीच्या खोऱ्यातील आंबा उत्पादकांना या वादळाने अक्षरशः उद्धवस्त केले आहे. वादळाचा तडाखा इतका जोरात होता की, बहुतांशी ठिकाणी आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. काले येथे वादळी वारा व पावसामुळे आंब्याचा सडा शेतामध्ये पडल्याचे चित्र आहे. चार ते आठ दिवसांत या भागातील आंबा काढणी सुरू होणार होती. या वर्षी आंब्याचे उत्पादन देखील कमी होते. त्यातच वादळी तडाख्याने आंब्याचे नुकसान केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने आंबा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत करून आंबा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंबा उत्पादक करत आहेत. निरगुडे येथे मोठे झाड कोसळल्याने स्मशानभूमीचे नुकसान झाले आहे. बेलसर ते येणेरे रस्त्यावर विजेचे खांब रस्त्याच्या दिशेने पूर्णतः वाकल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बहुतांशी ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने आदिवासी भागात वीजपुरवठा खंडित होता. बेलसर येथे दोन महिने कोरडेठाक असलेला मीना नदीचा बंधाऱ्यात पाणी साचले. काले येथे कुलदीप नायकोडी यांचा फरशीचा बाग जमीनदोस्त झाला आहे. कुसुर येथे राजेंद्र भगत यांचा अडीच एकर क्षेत्रावरील केळीचा बाग जमीनदोस्त होऊन जवळपास 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. संजय परदेशी यांच्या शेततळ्याचा कागद पूर्णतः फाटून गेल्याने नुकसान झाले आहे. पारुंडे येथे राजेंद्र पवार यांच्या आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज, पिंपरी पेंढार, वडगाव कांदळी आदी गावांत काल झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने केळी बागा भुईसपाट झाल्या आहेत. हाताला आलेलं पीक डोळ्यासमोर सपाट होताना पाहण्याखेरीज शेतकरी काही करू शकत नव्हते.
शेतकऱ्यांचे टोमॅटो, मका, भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. पिंपळवंडी येथील शेतकरी निखिल वाघ यांच्या कांद्याच्या बराकीचे पत्रे उडाले. गणेश महादेव पवार यांच्या घराची भिंत पडली. महादेव पवार यांच्या घरावर झाड पडले. तसेच, काकडे, वाघ, पवार, लेंडे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उंब्रज येथील शेतकरी रोहित देशमुख यांची केळीची बाग भुईसपाट झाली. हांडे, शिंगोटे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काळवाडी येथील शेतकरी वामन, बेल्हेकर यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ओतूर : चक्रीवादळाचा परिसरातील गावांना मोठा फटका बसला. कांदाचाळी, शेतीमाल, फळबाग, चारापिके, घरे, गोठ्यांचे यात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे पडून वाहतूक बंद असून काही गावांमध्ये वीज पुरवठा देखील खंडित आहे. जुउदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा, कोळवाडी, वाटखळ, मढ, सीतेवाडी, सांगनोरे, खिरेश्वर, नेतवड, माळवाडी, बल्लाळवाडी, रोहकडी, चिल्हेवाडी, पाचघर, आंबेगव्हाण, अहिनवेवाडी, सारणी, मांदारणे, कोपरे, मांडवे, मुथाळने आदी गावांना या वादळाचा फटका बसला आहे. आदिवासी भागातील घरांचे पत्रे उडाले असून भिंतीही पडल्या आहेत. आंबा, केळी, चिकू या फळबागांसह टोमॅटो, मिरची, काकडी, उन्हाळी बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. साठून ठेवलेला जनावरांचा चाराही भिजला आहे. ओतूर, बनकरफाटा व इतर गावठाणांत ठिकठिकाणी विविध बोर्ड, फलक, होर्डिंग्ज जमीनदोस्त झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.