इंदापूरच्या द्राक्षांना बाजारात यायला महिनाभर होणार उशीर, कारण...

राजकुमार थोरात
Sunday, 22 November 2020

जास्त झालेल्या पावसामुळे द्राक्षांचा हंगाम उशीरा सुरु होत असून, ग्राहकांना इंदापूरच्या द्राक्षांची चव चाखण्यासाठी एक महिना वाट पाहावी लागणार आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये चालू वर्षी दुप्पटीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे द्राक्षांचा हंगाम उशीरा सुरु होत असून, ग्राहकांना इंदापूरच्या द्राक्षांची चव चाखण्यासाठी एक महिना वाट पाहावी लागणार आहे.

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

इंदापूर तालुक्यामध्ये द्राक्षाचे सहा हजार एकर क्षेत्र आहेत.तालुक्यातील बोरी,भरणेवाडी, कळस, बिरंगुडी, शेळगाव, व्याहळी, लासुर्णे परीसरातील जंबो (काळी) ,शरद सिडलेस, नानासाहेब पर्पल, मामासाहेब पर्पल जातीचे द्राक्षे पुणे जिल्हासह परदेशामध्ये ही प्रसिद्ध आहेत.दरवर्षी इंदापूर तालुक्यातून हजारो टन द्राक्ष चायना,मलेशिया, थायलंड,दुबई व अरब कंट्रीमध्ये  निर्यात होतात. तसेच पुणे,मुंबई व दिल्लीच्या मार्केटमध्ये इंदापूरच्या द्राक्षांचा बोलबाला असतो.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये द्राक्षांचा हंगाम सुरु होताे.मात्र चालू वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पाउस झाला. याचा परीणाम द्राक्ष बागांच्या छाटणीवर झाला असून सुमारे एक महिना द्राक्ष हंगाम उशीरा सुरु होणार आहे. बोरी परीसरातील शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट नंतर द्राक्ष बागा छाटणीस सुरवात केली आहे. गतवर्षी व यापूर्वी शेतकरी १५ जुलै नंतर द्राक्षाची छाटणीस सुरवात करीत होते. उशीरा केलेल्या छाटणीमुळे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये द्राक्षाचा हंगाम सुरु होणार असून एक महिन्यामध्ये इंदापूर तालुक्यातील द्राक्षे बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

उत्पादनही घटणार- यासंदर्भात बोरीमधील प्रगतशिल शेतकरी व माजी सरपंच संदीप शिंदे यांनी सांगितले की, दरवर्षी १५ जुलै नंतर द्राक्ष छाटणीस सुरवात होते.मात्र अतिरिक्त झालेल्या पाउस व परतीच्या पावसाच्या धास्तीमुळे एक महिना उशीरा  छाटणी केली आहे. तसेच पावसाचा द्राक्षाच्या उत्पादनावरही परीणाम होणार असून उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains, the grape season started late