
लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, थेऊर, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील हजारो गोरगरीब कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी वरदान ठरलेल्या लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलधील कोविड केअर सेंटर जिल्हा परिषदेकडून निधी मिळत नाही. त्यामुळे मागिल पाच दिवसांपासून ते बंद असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
पूर्व हवेलीत मागिल काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा परीषदेकडून कोविड सेंटर चालवण्यासाठी निधी मिळत नसल्याच्या कारणास्तव विश्वराज हॉस्पिटलधील कोविड केअर सेंटर बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली आहे. विश्वराज हॉस्पिटलधील कोविड केअर सेंटर बंद पडल्याचा सर्वाधिक फटका महिला व गोरगरिब कोरोनाबाधित रुग्णांना बसला आहे. पूर्व हवेलीमधील कोरोनोबाधित रुग्णांना उपचारासाठी थेट नऱ्हे, वाघोली अथवा हिंजवडीसारख्या पुण्याच्या दुसऱ्या टोकाला जावे लागत असल्याची बाब पुढे आली आहे.
उरुळी कांचन, मांजरी बुद्रुक, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चार महिन्यापूर्वी विश्वराज हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात मोठे वाजत गाजत कोविड केअर सेंटर सुरु केले होते. त्यामुळे मागिल चार महिन्याच्या काळात रुग्णांची बेडसाठी धावपळ पूर्णपणे थांबली गेली होती. मात्र, मागिल चार महिन्याच्या काळात जिल्हा परिषदेने या कोविड केअर सेंटरसाठी एकही रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे विश्वराज हॉस्पिटलच्या प्रशासनाने कोविड केअर सेंटरला मदत करण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरोग्य विभागाने मागिल चार महिन्यापासून कोविड केअर सेंटर बंद ठेऊन या परिसरातील रुग्ण नऱ्हे, वाघोली अथवा हिंजवडीसारख्या विविध भागात पाठविण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातील एक वरीष्ठ अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर अधिक माहिती देताना सांगितले की, जिल्हा परीषदेच्या डॉ. रखमाबाई राऊत योजनेच्या माध्यमातून निधी पुरवण्याच्या अटीवर कोविड केअर सेंटर सुरु करण्यास विश्वराज हॉस्पिटल प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र, मागिल चार महिन्याच्या काळात जिल्हा परिषदेने एकही रुपया विश्वराज हॉस्पिटल प्रशासनाला दिला नाही. त्यामुळे मागिल चार दिवसांपासून कोविड केअर सेंटर चालु ठेवण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित नागरिकांना बेडसाठी पुन्हा पळापळ करावी लागत असली तरी आमचा नाईलाज आहे. निधी मिळावा, यासाठी जिल्हा परीषदेकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यातून लवकरच मार्ग निघण्याची शक्यता आहे.
सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भरत शेंडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या डॉ. रखमाबाई राऊत योजनेस शासनाकडुन मुदत वाढवून न मिळाल्याने लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरला निधी देता आलेला नाही. योजनेस शासनाकडुन मुदत वाढवून मिळावी, यासाठी पाठपुरावा चालु ठेवलेला आहे. तसेच, विश्वराज हॉस्पिटलची चार महिन्यापैकी दोन महिण्याची बिले त्वरीत देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. तसेच, वरील कोविड सेंटर सुरु करण्याच्या सुचनाही आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात सेंटर सुरु होईल.
लोकप्रतिनिधी नावालाच
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाबाधइत रुग्णांना चांगले व घराजवळच उपचार मिळावेत, यासाठी पुणे शहरासह जिल्हाच्या विविध भागात रुग्णालय व कोविड केअर सेंटर सुरु होत आहेत. मात्र, पूर्व हवेलीत कोरोना धुमाकुळ घातलेला असताना मागिल चार महिन्याच्या काळात बेड उपलब्ध करुन देण्याबाबत व कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत खासदार, आमदार व वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ घोषणाच झालेल्या आहेत. यामुळे रुग्णांची उपचारासाठी धावपळ सुरुच आहेत. त्यातच १४० बेडचे कोविड सेंटर बंद पडल्याने रुग्णांच्या नभिबात दुष्काळात तेरावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्व हवेलीमधील नागरीकात मोठा असंतोष पसरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.