महाविद्यालयांच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठात फेऱ्या

Due to non-cooperation from colleges in Pune, Ahmednagar and Nashik districts, many students are coming every day to work in the examination department of Pune University
Due to non-cooperation from colleges in Pune, Ahmednagar and Nashik districts, many students are coming every day to work in the examination department of Pune University

पुणे : माझे बीएसससी प्रथम वर्ष झाले आहे, पण आजारपणामुळे नंतर गॅप पडला, आता बॅकलॉगचे विषय द्यायचे आहेत, तर याबाबत महाविद्यालयाकडून काहीच मदत केली जात नाही. तुम्ही विद्यापीठात जा आणि तुमचा प्रश्‍न मार्गी लावा किंवा पुन्हा नव्याने प्रवेश घ्या असे सांगितले जात आहे, असे नगर जिल्ह्यातील राहुल जाधव सांगत होता.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे 950 महाविद्यालये आहेत. यात सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परीक्षा अर्जात त्रुटी, विषय चुकीचा भरणे, उशिरा अर्ज भरणे, निकालात त्रुटी असणे, श्रेणीसुधार, गुणपत्रिका लवकर न मिळणे यासह अनेक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांना पुणे विद्यापीठाशी संपर्क साधण्यास सांगितले जाते. महाविद्यालयांकडून सहकार्य होत नसल्याने रोज अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात काम करून घेण्यासाठी आलेले असतात.

पत्र देऊन विद्यार्थ्याला पाठवले जाते

महाविद्यालयांमध्ये विद्यापीठातील परीक्षा विभाग किंवा इतर कामांसाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिलेली असते. ते विद्यापीठात येतही असतात. पण महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या नावाने पत्र तयार करून देऊन त्यांना विद्यापीठात पाठवून दिले जाते. नाशिक, नगर, पुणे ग्रामीणमधून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. त्यासाठी आर्थिक भुर्दंडही पडतो. परीक्षा विभागात येणारे विद्यार्थी, पालकांना नियमांची माहिती नसते, कोणत्या टेबलावर कोणते काम होते हे देखील कळत नाही, त्यामुळे परीक्षा विभागात येऊनही कामे होत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

माझ्या निकालात तांत्रिक चुका असल्याने मी अनुत्तीर्ण झालो होतो, त्यामुळे महाविद्यालयाशी संपर्क साधल्यावर आमचा याच्याशी काही संबंध नाही, विद्यापीठाशी किंवा विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात जाऊन चौकशी करा असे सांगण्यात आले. अखेर विद्यापीठात येऊन तक्रार करावी लागली.
- अजय भालेराव, नाशिक

विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यामधील दुवा म्हणून महाविद्यालये काम करतात. विद्यार्थ्याने फक्त ट्रान्सक्रीप्ट, डुप्लिकेट गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्रासाठी अशा वैयक्तिक कामासाठी विद्यापीठात येणे आवश्‍यक आहे. पण इतर कोणत्याही दैनंदिन किंवा परीक्षेशी संबंधित कामे महाविद्यालयांकडूनच झाली पाहिजेत. विद्यार्थी परीक्षा विभागात आल्याने कामात अडथळे येतात. येत्या काळात महाविद्यालयांच्या परीक्षा विभागांची बैठक घेऊन त्यांना सूचनाही दिल्या जातील.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

ऑनलाइन परीक्षा घेताना विद्यापीठाने थेट परीक्षा अर्ज भरून घेतले. त्यामध्ये महाविद्यालयांचा काहीच संबंध नव्हता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणींची माहिती महाविद्यालयांकडे नसल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठात यावे लागले. या पुढे होणाऱ्या परीक्षांचे अर्ज महाविद्यालयांच्या माध्यमातून भरून घ्यावेत, अशी मागणी विद्यापीठाकडे केली आहे.
-डॉ. सुधाकर जाधवर, सचिव, प्राचार्य महासंघ

निरीक्षणे

- परीक्षा, प्रवेश यासह तांत्रिक अडचणींबाबत महाविद्यालयांकडे अपुरी माहिती
- अडचणींबाबत तोडगा काढण्याऐवजी थेट विद्यापीठाकडे पाठवले जाते
- विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा वाया जातो, मानसिक तणावाला सामोरे जावे लागते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com