Breaking : पुण्यातील सहकारी बॅंकेवर 'ईडी'चा छापा; कसून सुरूय झाडाझडती!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

भोसले यांच्या लॅंड क्रूझर, टोयाटो कॅमरे अशा दोन आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (ता.१५) सकाळी बॅंकेच्या मुख्यालयावर छापा टाकला आहे. ईडीच्या अधिका-यांकडून या गुन्ह्यातील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक शुक्रवारी सकाळीच शहरात दाखल झाले होते.

Pune Gram Panchayat Election Live Updates : तिसऱ्या टप्प्यातही भोर आघाडीवर; 60.41% मतदान​

बॅंकेतील 71 कोटी 78 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी संचालक आमदार अनिल भोसले यांच्यासह 16 पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आमदार भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव यांना पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी आवश्‍यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते.

भोसले यांच्या लॅंड क्रूझर, टोयाटो कॅमरे अशा दोन आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच त्यांच्या 32 कोटी रुपयांच्या मालमत्ता अधिगृहीत करण्याचा प्रस्तावही सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव नऱ्हे) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​

भोसलेंची 170 बॅंक खाती :
भोसले यांच्याकडे कोरेगाव मूळ येथे स्वतःची शेती आहे. तसेच शिवाजीनगर, विश्रांतवाडी, कोथरूड, वारजे यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात दुकाने, व्यावसायिक संकुल, दुकाने, सदनिका, मिळकती अशा 18 हून अधिक मालमत्ता आहेत. त्याचबरोबर त्यांची 170 बॅंक खाती असून त्यामध्ये एक कोटी 90 लाख रुपयांची रोकड आहे. संपूर्ण मालमत्तेची किंमत 32 कोटी रुपये इतकी असून ही मालमत्ता अधिगृहीत करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे.

निर्बंध घातल्यावर काढले सव्वा दोन कोटी :
बॅंकेवर निर्बंध घातल्यानंतरही या प्रकरणातील आरोपींनी बॅंकेतून एकूण दोन कोटी 14 लाख रुपये काढून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. अनिल भोसले आणि जाधव यांच्या सांगण्यावरून पडवळ व शैलेश भोसले यांनी गैरव्यवहाराची रक्कम बॅंकेतून काढली. अमर जाधव यांचे 80 कोटी रुपयांचे चेक डिस्काउडींकरता तीन कोटी 25 लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED has raided fraud case Shivajirao Bhosale Sahakari Bank headquarter in Pune