‘जेन झी’चे अनुभव व्याख्यान

‘जेन झी’चे अनुभव व्याख्यान
Published on

देशासाठी सर्वांनी लढ्याला साथ द्यावी

श्रावणी बुवा, वैभव चोपकर; व्यवस्था बदलण्यासाठी लढून जिंकलो

सातारा, ता. २१ ः पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांच्या हत्या करण्यात आल्या; परंतु त्यांचे विचार कोणी मारू शकले नाही. विचार आपली ताकद आहे. लेखणी, मेंदू, पुस्तके ही आपली हत्यारे आहेत. शिक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागले ही शोकांतिकाच म्हणावी लागेल; परंतु व्यवस्थेत बदलासाठी लढलो आणि त्यात जिंकलो. आपल्या मनातील देशासाठी आता सर्वांनाच संघटित राजकारण करावे लागेल. लढ्याला साथ द्यावी, अशी अपेक्षा स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाचे जिल्हा संयोजक श्रावणी बुवा, तसेच वैभव चोपकर यांनी व्यक्त केली.
परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती व राष्ट्रीयता जागर अभियान यांच्या वतीने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड शेख बंडू इनामदार ऊर्फ कॉम्रेड शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात ‘जेन झी’ आंदोलनाची नवी राजकीय भाषा आणि पुढील दिशा या विषयावर आयोजिलेल्या व्याख्यानात श्रावणी बुवा, तसेच वैभव चोपकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. आर. के. चव्हाण होते.
श्रावणी बुवा व वैभव चोपकर यांनी या आंदोलनाला कोणाचाही चेहरा नव्हता, असे स्पष्ट करत केवळ शिक्षण या मुद्द्यावर विद्यार्थी संघटना सहभागी झाल्याचे नमूद केले. काही जण नोकऱ्या सोडून आंदोलनात आले, तर काहींनी घरात न सांगता केवळ व्यवस्थेमधील त्रुटींवर रोष व्यक्त करण्यासाठी सहभाग घेतला. पोलिसांकडून लाठीमार झाला, अश्रुधूर सोडला गेला, तरी एकही जण मागे हटला नाही हे सांगताना आपल्याच देशात आपल्याच मुलांवर हल्ले करणाऱ्यांची कीव वाटते, असेही त्यांनी नमूद केले. क्रांतिकारी भगतसिंग यांच्या विचाराने अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार केला आणि त्यात यश मिळविल्याचा आनंद असल्याचे म्हटले. सोनम वांगचूक, अभिजित दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या. प्रारंभी अमित कांबळे, चंद्रकांत खंडाईत, श्याम चिंचणे यांनी स्वागत केले. विजय मांडके यांनी प्रास्ताविक केले. मिनाज सय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध संस्था, संघटनांचे सदस्य, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनातील सांगितलेली वैशिष्ट्ये
-----------
- शिक्षण हा राजकीय विषय झाला.
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, एनटीए बरखास्त करणे हेच ध्येय होते.
- महिलांचे नेतृत्व मान्य केले.
- वेगळा नवीन भारत सर्वांनीच पाहिला.

PNE26W43742
सातारा ः ‘जेन झी’च्या भाषेवर चर्चात्मक कार्यक्रमात बोलताना श्रावणी बुवा.
(प्रमोद इंगळे ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com