पुण्या- मुंबईतून आलेल्यांवर आंबेगावात करडी नजर 

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 23 मे 2020

 आंबेगाव तालुक्‍यात साकोरे व शिनोली येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. अजून पाच संशयितांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात साकोरे व शिनोली येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. अजून पाच संशयितांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

या पार्श्वभूमीवर तालुक्‍यात पुणे व मुंबईहून आलेल्या आठ हजार जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांना घराबाहेर न पडण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्यांचावर करडी नजर ठेवण्यासाठी व कायदेशीर कारवाई करण्यासाठी मंचर व घोडेगाव पोलिसांनी तीन भरारी पथके रात्रंदिवस कार्यरत केली आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आंबेगाव तालुक्‍याचे मध्यवर्ती ठिकाण व 50 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मंचर शहरात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. पुणे व मुंबईहून आलेल्या 350 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. किराणा, भाजीपाला, औषधे व अन्य जीवनावश्‍यक वस्तू त्यांना घरपोच करण्याचा निर्णय सरपंच दत्ता गांजाळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या कोरोना ग्राम सुरक्षा समितीने घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्य, कामगार तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचा समावेश असलेल्या कोरोना ग्राम सुरक्षा समित्या प्रत्येक वॉर्डात स्थापन केल्या असून, संबंधितांचे मोबाईल क्रमांक प्रसिद्धी पत्रकात दिले आहेत. याबाबत ध्वनिक्षेपकावरून शहरात जनजागृती सुरू आहे. 

सासवडकरांचे टेन्शन वाढले, शहराजवळील गावात कोरोनाचा रुग्ण  

या व्यतिरिक्त अडचण आल्यास किंवा प्रतिसाद न मिळाल्यास इमर्जन्सी कॉल म्हणून गांजाळे यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक (901104444) दिला आहे. एकूण सहा वॉर्डमध्ये या समित्या काम करणार आहेत. परगावावरून व परराज्यातून आलेल्या व्यक्तींना व त्यांच्या नातेवाइकांना चौदा दिवस घराबाहेर पडता येणार नाही. घराबाहेर फिरताना आढळल्यास मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना महात्मा गांधी विद्यालयाच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. महात्मा गांधी विद्यालयात सध्या पाच जणांना होम क्वारंटाइन केले आहे. 

बारामतीतील माळेगाव कारखान्यात आठ कामगार गुदमरले

मंचर शहरासह आंबेगाव तालुक्‍यातील 104 गावांत होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवण्याचे काम मंचर व घोडेगाव पोलिस ठाण्याची तीन भरारी पथके करणार आहेत, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, अनेक गावांत होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा दल समित्यांना दाद देत नाहीत. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. त्यामुळे पोलिसांची तीन भरारी पथके 24 तास कार्यरत केली आहेत. घराबाहेर पडणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight thousand people from Pune and Mumbai have been quarantined in Ambegaon taluka