अबब! या महापालिकेने केले तीन मिनिटांत १८ विषय मंजूर

PCMC
PCMC

पिंपरी - जुन्या मिळकतींच्या करयोग्य मूल्यात वाढ करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी मंजूर झाला. मात्र, सभागृहात बोलू दिले नाही, त्यामुळे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पाण्याच्या काचेचा ग्लास फोडला. त्यावरून सभागृहात गोंधळ झाला. राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या मदतीला धावून आले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी कलाटे यांचा निषेध केला. या गोंधळाच्या अवघ्या तीन मिनिटांत पाच उपसूचनांसह १८ विषय महापौर उषा ढोरे यांनी मंजूर केले.

महापालिका अधिनियमानुसार, करयोग्य मूल्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ठेवला होता. २० फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी तो मंजूर करण्याची मागणी होती. 

हा विषय दफ्तरी दाखल करण्याची शिफारस स्थायी समितीने केली होती. मात्र, २० फेब्रुवारीची सभा तहकूब केल्याने तो लागू झाला. त्यावरील चर्चेत बोलू दिले नाही, म्हणून कलाटे यांनी ग्लास फोडला. त्यावरून सभागृहात गोंधळ झाला. मंजूर केलेले विषय पुढीलप्रमाणे.

विविध शुल्क माफ
महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या कडेला विविध भूमिगत सेवावाहिन्या टाकण्याकरिता खोदकाम करण्याची मागणी विविध संस्था करतात. यात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीसुद्धा आहे. त्यांना खोदाई शुल्कात सवलत दिली जाते. त्यामुळे एमएनजीएलच्या वाहिन्यांवर काम करण्यासाठी महापालिकेला शुल्क द्यावे लागते. असे विविध शुल्क माफ करण्याबाबत आयुक्तांचा प्रस्ताव होता. त्याला सर्वसाधारण सभेची शिफारस आवश्‍यक होती. 

पार्किंग शुल्क
पार्किंग पॉलिसीनुसार शुल्क वसुलीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तिला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, पार्किंग शुल्क आकारणी दर कमी असल्याने प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आयुक्तांनी प्रतितास सुधारित दर निश्‍चित करून प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. त्यात दुचाकी व रिक्षा पाच रुपये, मोटारी १० रुपये, टेम्पो- मिनी ट्रक १५ रुपये, मिनी बस २५ रुपये, खासगी बस-ट्रक- ट्रेलर १०० रुपये असे शुल्क ठरविलेले होते. या सुधारित दरास सभेने मान्यता दिली. 

मेट्रो नामकरण
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे नाव ‘पुणे मेट्रो’ असे आहे. ते ‘पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो’ करावे, पुणे-मुंबई महामार्गावरील मोरवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरचे ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर समतल विलगक’, चौकातील बीआरटी बस थांब्याला ‘अहिल्यादेवी होळकर चौक, मोरवाडी’ आणि मेट्रो स्टेशनला ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पीसीएमसी पिंपरी मेट्रो स्टेशन’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली. 

आवास योजना
चऱ्होली, रावेत व मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेनुसार गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे अनुक्रमे १४४२, ९३४ आणि १२८८ अशा तीन 
हजार ६६४ सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी लाभार्थी, त्यांचा हिस्सा व सोडत प्रक्रिया निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यातील लाभार्थ्यांना केंद्र सरकार दीड लाख व राज्य सरकार एक लाख रुपये अनुदान देणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना स्वहिस्सा म्हणून भरायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com