Pune : निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे मानधन सभासदांच्या संख्येनुसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहनिर्माण सोसायटी निवडणूक

Pune : निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे मानधन सभासदांच्या संख्येनुसार

पुणे : अडीचशे सभासदांच्या आतील गृहनिर्माण सोसायट्यांची निवडणूक घेताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे अंदाजे मानधन किती असावे, याबाबत सहकार विभाग किंवा पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था फेडरेशनकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु सोसायटीतील सभासदांच्या संख्येनुसार मानधन असावे, असे पॅनेलवरील काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सूचविण्यात आले आहे. अडीचशे सभासदांच्या आतील सोसायट्यांची निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हेही वाचा: चित्रा वाघ यांचा पत्ता कट, विधानपरिषदेसाठी बावनकुळेंना संधी!

सहकार विभागाच्या पॅनेलवरील काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनुसार, निवडणूक घेताना प्रारूप मतदार यादी तयार करणे, दावे, हरकती, सूचना मागवून अंतिम यादी तयार करणे, मतदान घेणे अशा प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे मानधन हे १ ते २५ सदनिकांसाठी सुमारे चार हजार रुपये असावे. २५ ते ५० सभासदांसाठी पाच हजार रुपये, ५० ते १०० सभासद संख्येसाठी सहा हजार रुपये तसेच, शंभर ते दीडशे सभासदांसाठी बिनविरोध साडेसहा हजार रुपये आणि मतदान झाल्यास सात हजार रुपये मानधन अपेक्षित आहे.

हेही वाचा: रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने जिंकली पहिली मालिका

दीडशे ते दोनशे सभासद संख्येसाठी निवडणूक बिनविरोध झाल्यास सात हजार रुपये आणि मतदान घेतल्यास साडेसात हजार रुपये असावे. दोनशे ते अडीचशे सभासद संख्येसाठी निवडणूक बिनविरोध झाल्यास सात हजार रुपये आणि मतदान घेतल्यास सुमारे आठ हजार रुपये मानधन असावे. याव्यतिरिक्त प्रवास भत्ता आणि मदतनीसाची गरज भासल्यास तोही खर्च असावा, असे सूचविण्यात आले आहे.

सभासदाला नेमल्यास कमी खर्च

अडीचशे सभासदांच्या सोसायटीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याचा अधिकार त्या सोसायटीला आहे. त्यासाठी सोसायटीने शक्यतो सोसायटीमधील सभासदाची नेमणूक करावी. एखाद्या सभासदाची नेमणूक करताना तो सभासद विद्यमान संचालक मंडळामधील किंवा नियोजित निवडणूक लढविणारा नसावा. सभासदास निवडणूक निर्णय अधिकारी नेमल्यास कमी खर्च येईल. परंतु त्या सभासदाला पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था फेडरेशनकडून प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे, असे फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी सांगितले.

ऑनलाइन प्रशिक्षण २७ नोव्हेंबरला

अडीचशेपेक्षा सभासद संख्या कमी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांची निवडणूक प्रक्रियेविषयी येत्या २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ ते ६ या कालावधीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फेडरेशनकडून देण्यात आली.

"गृहनिर्माण सोसायटीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करावयाची आहे, त्यामुळे त्यांचे मानधन सोसायटीनेच निश्चित करणे अपेक्षित आहे. मानधनाबाबत प्रशासनाकडून कोणता निर्णय घेण्यात आलेला नाही."

- एन.व्ही. आघाव, जिल्हा उपनिबंधक, पुणे शहर

loading image
go to top