सोसायट्यांची निवडणूक आठवडाभरात; नियमावली लवकरच 

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 14 January 2021

राज्य सरकारने नागपूर येथील मागील अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. या निर्णयाची  अंमलबजावणी करण्यात सहकार विभागातील अधिकारी-कर्मचारी व्यस्त होते.

पुणे - ""राज्यातील अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय आठवडाभरात जाहीर होणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकींबाबत नियमावली एका आठवड्यात जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर सोसायट्यांना लगेचच निवडणुकाही घेता येतील,'' अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी "सकाळ' शी बोलताना दिली. 

राज्य सरकारने सहकारी संस्थांसह गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. ही मुदत 31 डिसेंबर रोजी संपली होती. त्यामुळे राज्य निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना त्यातून वगळण्यात आले होते. गृहनिर्माण सोसायट्यांना ही निवडणूक कशी घ्यावी, याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका नेमक्‍या कधी होणार, असा प्रश्‍न पदाधिकारी आणि सभासदांना पडला होता. 

राज्य सरकारने नागपूर येथील मागील अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. या निर्णयाची  अंमलबजावणी करण्यात सहकार विभागातील अधिकारी-कर्मचारी व्यस्त होते. त्यामुळे नियमावलीअभावी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका आणखी तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांनीच काम पाहावे, असे निर्देश दिले होते. 

IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​

कोरोनाच्या कालावधीत गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. परंतु काही सोसायट्यांच्या सभासदांमध्ये बऱ्याचदा अंतर्गत धुसफूस, मेंटेनन्सचा वाद आणि "इगो प्रॉब्लेम'च्या राजकारणामुळे काही पदाधिकारी कामकाज करण्यास उत्सुक नसतात. परंतु मुदतवाढीमुळे त्यांनाही सोसायटीच्या कामकाजातून बाहेर पडणे अवघड झाले होते. तर सोसायटीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक सभासदांची अडचण झाली होती. 

 पुण्यातील इंजिनिअरिंगच्या तरुणीला फास्ट बाईक चालवणं पडलं महागात!​

अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका त्यांच्याच पातळीवर व्हाव्यात. परंतु ज्या संस्थांमध्ये अडचणी आहेत, त्याठिकाणी सहकार खात्याचा प्राधिकृत अधिकारी नेमण्यात यावा, अशी सूचना महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाने केली आहे. 
- सुहास पटवर्धन, उपाध्यक्ष, राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघ 

राज्यातील गृहनिर्माण संस्था : सुमारे एक लाख 
अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था : 80 हजार 

 

पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था : 18 हजार 
अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था : 15 हजार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections of Co-operative Housing Societies