उद्योगक्षेत्राला लॉकडाउनचा धसका! मंत्र्यांच्या इशाऱ्यामुळे उद्योजक टेन्शनमध्ये!

Industry_Sector
Industry_Sector

पुणे : पहिल्या लॉकडाउनमधून शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील उद्योग क्षेत्र अजूनही सावरलेले नसताना, पुन्हा लॉकडाउनच्या नुसत्या चर्चेनेच उद्योग क्षेत्र धास्तावले आहे. पुन्हा लॉकडाउन झाल्यास उद्योग क्षेत्रावर विपरित परिणाम होतील अन्‌ रोजगाराचाही प्रश्‍न गंभीर असेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच अर्थव्यवस्थेवरही दूरगामी अनिष्ट परिणाम होतील, अशीही भीती त्यांना वाटते.

राज्यात मुंबई, ठाणे खालोखाल सर्वाधिक उद्योग पुण्यात आहेत. तसेच या शहरात 13 औद्योगिक वसाहतीही आहेत. पुण्यात सुमारे अडीच लाख उद्योग असून त्यात 16 लाखांपेक्षा जास्त कामगार आहेत. या उद्योगांत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. पहिल्या लॉकडाउनच्या काळात एप्रिल, मे, जूनमध्ये उद्योग पूर्णतः बंद होते. अजूनही त्यांची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे हे उद्योग- व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने वित्त पुरवठा, कर्जाच्या हप्त्यांना मुदतवाढ आदी उपाययोजना कराव्या लागल्या.

या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकार लॉकडाउनच्या प्रस्तावावर विचार करीत आहे, असे सूतोवाच काही जबाबदार मंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्र चिंताक्रांत झाले आहे. गावाकडे गेलेले मनुष्यबळ अजूनही पूर्ण संख्येने परतलेले नाही. परिणामी आता पुन्हा असा काही निर्णय झाला तर, कामगारांना रोजगार कसा द्यायचा, त्यांची काळजी घ्यायची, उद्योगांवर अवलंबून असलेल्या व्यवसायांचे कसे होणार, याची चिंता उद्योग कंपन्यांना पडली आहे.

उद्योग बंद पडले, तर सुट्या भागांची वाहतूकही अवघड होईल. त्यातून निर्बंधांमुळे उत्पादन, विपणन, विक्रीवरही अनिष्ट परिणाम होऊ शकतील. म्हणून राज्य सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी पावले उचलावीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या उपाययोजनांची नागरिकांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असा आग्रह धरावा. परंतु, लॉकडाउनची उपाय नको, असे उद्योग क्षेत्राची आग्रही मागणी आहे. ज्या देशांत युरोपियन देशात कोरोनाची दसुरी लाट आली आहे, तेथे उद्योग बंद ठेवण्यात आलेले नाहीत, याकडेही काही उद्योजकांनी लक्ष वेधले.

पुन्हा लॉकडाउन हा अत्यंत चुकीचा विचार असेल. तो झाला तर, अनेक उद्योग कायमचेच बंद पडतील. महसूल, रोजगार यावर विपरित परिणाम होईल. बॅकांचे हप्ते किती काळ लांबणीवर टाकणार, संपूर्ण अर्थचक्र पुन्हा संकटात येईल. त्यापेक्षा कोरोनाचा सामना कसा करायचा, याचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. त्यासाठी नागरिकांना विश्‍वासात घेतले पाहिजे अन उद्योगांनीही राज्य सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे. पण पुन्हा लॉकडाउन नको.
- सुधीर मेहता (अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर)

राज्य सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा पुन्हा विचार करू नये. जर तो झाला तर, उद्योग अक्षरशः संपतील. उद्योगांवर निर्बंधही लागू करू नयेत. कारण पहिल्या लॉकडाउनमधून उद्योग अजूनही संपूर्णतः सावरलेले नाहीत. क्षेत्र कोणतेही असो, ग्राहक बाजारपेठेत फारसे येत नाहीत. त्यामुळे लॉकडाऊनच्या चर्चेने त्यांची नकारात्मक मानसिकता निर्माण होईल आणि त्याचा उद्योग नव्हे तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.
- अल्केश रॉय (शहराध्यक्ष, कॉन्फड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री)

पुन्हा लॉकडाउन, ही कल्पना विचारही करवत नाही. राज्य सरकारने सक्ती केली तरी, ती उद्योजक तिची अंमलबजावणी करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. कर्ज- उधारीवर सध्या उद्योग सुरू आहेत. पुन्हा लॉकडाउन झाला तर अनेक उद्योग कायमचेच कोसळून पडेल. त्यातून बेरोजगारी वाढेल. सूक्ष्म आणि लघु उद्योग अजूनही सावरलेले नाहीत. त्यात पुन्हा आता संकट नको.
- संदीप बेलसरे (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघउद्योग संघटना) 

अर्थव्यवस्था, उद्योग आणि संबंधित क्षेत्रांचा आढावा घेतला तर, लॉकडाऊन लागू करू नये, असे वाटते. "आयटी'चेही वर्क फ्रॉम अजूनही सुरू आहे. पण अर्थव्यवस्था आणि जनजीवनाचा विचार केला तर, लॉकडाऊन हा काही एकमेव उपाय आहे, असे वाटत नाही. उलट कोरोनाचा सामना चांगल्या पद्धतीने करण्याचा विचार केला पाहिजे.
- अश्‍विन मेघा (अध्यक्ष, सॉफ्टवेअर एक्‍सपोर्ट असोसिएशन ऑफ पुणे) 

पहिल्या लॉकडाऊनमुळे सूक्ष्म, लघु उद्योगांना जबर फटका बसला आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे दुसरा लॉकडाऊन झाला तर, ते संपूणच जातील. गेले 6 -7 महिने विस्कटलेली आर्थिक घडी अजूनही सुरळीत झालेली नाही. अनिश्‍चिततेमुळे सुट्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे अगोदरच उद्योगांची परिस्थिती बिकट झालेली असताना लॉकडाउनचे नव्याने संकट नको. त्याचा राज्य सरकारने गांभिर्याने विचार करावा.
- साईनाथ डोके (ट्रान्सफॉर्मर उत्पादक)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com