पुणे जिल्ह्यातील साखर उताऱ्यात दीड टक्क्याने घट

संतोष शेंडकर
Wednesday, 25 November 2020

पुणे जिल्ह्यातील सोळा कारखान्यांनी २५ ते ३० दिवसांत २४ लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. लहरी हवामानामुळे थंडी न पडल्याने साखर उतारा अवघा ९.४९ टक्के इतकाच आहे. उताऱ्यातील ही दीड टक्के घट आर्थिक फटका देणारी ठरणार आहे.

सोमेश्वरनगर - पुणे जिल्ह्यातील सोळा कारखान्यांनी २५ ते ३० दिवसांत २४ लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. लहरी हवामानामुळे थंडी न पडल्याने साखर उतारा अवघा ९.४९ टक्के इतकाच आहे. उताऱ्यातील ही दीड टक्के घट आर्थिक फटका देणारी ठरणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात चालू हंगामात दहा सहकारी, तर सहा खासगी कारखान्यांसमोर तब्बल १३० ते १४० लाख टनाच्या गाळपाचे आव्हान आहे. त्यादृष्टीने १५ ऑक्टोबरलाच कारखाने सुरू करण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. कारखाने सुरू होऊन पंचवीस दिवस ते महिना लोटला आहे. आजअखेर सोळा कारखान्यांनी सुमारे २४ लाख टन उसाचे गाळप केले आहे. साखर उताऱ्यात सोमेश्वर कारखान्याने, तर गाळपात बारामती अॅग्रोने जिल्ह्यात अव्वल कामगिरी केली आहे.

पुणे ते जयपूर व्हाया कोल्हापूर; पुणे पोलिस पाषाणकरांपर्यंत कसे पोचले?

बारामती अॅग्रोचे व्यवस्थापन सर्वात आधी कारखाना सुरू करण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे साडेतीन लाख टनांचा टप्पा गाठला आहे. त्यापाठोपाठ दौंड शुगरने दोन लाखांची, तर सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती, विघ्नहर, नीरा भीमा, पराग ॲग्रो, श्रीनाथ म्हस्कोबा या कारखान्यांनी दीड लाखाची पायरी ओलांडत अतिरिक्त उसाच्या गाळपाचा सपाटा लावला आहे. ऊसतोडणी यंत्रणा पुरेशी आलेली नाही. मात्र, पन्नासपेक्षा जास्त हार्वेस्टरशी (ऊसतोडणी यंत्र) करार केल्याने गाळपाचा वेग वाढणार आहे.

व्यावसायिक गौतम पाषाणकर का निघून गेले? वाचा सविस्तर

जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा साडेअकरा टक्के इतका आहे. हंगामाच्या सुरुवातीला दहा-साडेदहा टक्के उतारा मिळतो. या वेळी मात्र महिना उलटला तरीही थंडी वाढायचे नाव घेत नसल्याने साखर उतारा सरासरी साडेनऊ टक्क्यांवरच घुटमळत आहे. काही कारखान्यांनी साखरेचा अंश जादा असलेल्या मोलासेसपासून (बी हेवी) इथेनाॅलनिर्मिती सुरू केल्यानेदेखील उताऱ्यात सव्वा टक्का घट होत आहे.

अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्तांची पुणे विद्यापीठाला भेट 

याबाबत संत तुकाराम कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले म्हणाले की, या हंगामात साखर उताऱ्यात खूप घट झाली आहे. परिणामी साखरनिर्मितीतही घट होते. चांगला उतारा असेल तर शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी साखरेवर बँकेकडून जादा उचल मिळते. आता कारखान्यांना पैसे उपलब्धतेसाठी अडचण संभवणार आहे. भीमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे म्हणाले, पाऊस, संप अशा कारणांनी कारखाना पंधरा दिवस उशिरा सुरू झाला आहे. उताऱ्यात हळूहळू वाढ होईल.   

साखर उतारा घसरण्याची कारणे

  • काही कारखान्यांकडून ‘बी हेवी’ मोलासेसपासून इथेनॉलनिर्मिती
  • हंगामाच्या तोंडावर झालेली अतिवृष्टी
  • ढगाळ वातावरण व पुरेशा सूर्यप्रकाशाचा अभाव
  • थंडीचा अभाव

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar extraction Pune district decreased one and half percent