'जिंदगी मिलके बिताऐंगे'; कलाकारच बनले एकमेकांचे आधार!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

अन्न, वस्र आणि निवाऱ्याबरोबर मनोरंजन ही देखील गरज आहे. आजपर्यंत‌ कलाकारांनी लोकांचे मनोरंजन केले. आता‌ कलाकारांवर वेळ आली आहे.

पुणे : कोरोनाचे संकट ओढावले. आर्थिक उत्पन्न थांबले; पण 'एकमेकां सहाय्य करू' या भावनेतून कलाकारच एकत्र आले आणि समाजाच्या मदतीने एकमेकांचा आधार बनले. त्यांनी १११ गरजू कलाकारांना हातही दिला.

लॉकडाऊनमुळे अनेक गायक, वादक आणि अन्य कलाकार अडचणीत आले आहेत. पाच महिने उत्पन्न नसल्याने दैनंदिन साहित्य उपयोगाचे साहित्य खरेदी कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. अशा परिस्थितीत हे कलाकार‌ एकमेकांसाठी उभे राहिले. गेली महिनाभर ते प्रत्येकाकडे चौकशी करून त्यांची गरज‌ समजून घेत होते. त्यातून १११ गायक, वादक, लाइट, साऊंड तंत्रज्ञांना दैनंदिन उपयोगाच्या वस्तू देण्यात आल्या.

'गुगल क्‍लासरूम'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन; महाराष्ट्र ठरलं देशातील पहिलं राज्य!​

महावीर जैन विद्यालयात अभिनेता प्रवीण तरडे, अखिल भारतीय‌ चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उद्योजक दीपक भटेवरा, मनोज मांढरे, विद्यालयाचे युवराज शहा, गायक जितेंद्र भुरूक यांच्या उपस्थितीत हे वितरण करण्यात आले. यावेळी तरडे म्हणाले,‌ "अन्न, वस्र आणि निवाऱ्याबरोबर मनोरंजन ही देखील गरज आहे. आजपर्यंत‌ कलाकारांनी लोकांचे मनोरंजन केले. आता‌ कलाकारांवर वेळ आली आहे. या‌ काळात मानसिक संतुलन ढळू न देता, खचून न जाता सक्षम कलाकारांनी इतर कलाकारांसाठी उभे राहिले  पाहिजे."

पोलिसांच्या या कामाला सॅल्यूट कराच...माळरानावर बहरणार नंदनवन​

शहा म्हणाले, "समाजाच्या‌ व्यथा-वेदना कलाकार मांडत‌ असतो. पण त्याच्या वेदना त्याला सांगता येत नाहीत आणि सहन देखील करता येत नाहीत. अशावेळी सर्वांनी एकत्र येऊन मने हलकी केली पाहिजेत, तरच‌ अनुचित घटना टळतील आणि आयुष्याची पुढील वाटचालही सुरळीत होईल."

मेघराज राजेभोसले म्हणाले, "कोरोनामुळे सर्वच‌ क्षेत्रात संकट आले आहे. त्याचा जास्त फटका कला क्षेत्राला बसला आहे, पण ही वेळही जाईल, जनजीवन पूर्ववत होईल. गेल्या पाच महिन्यातील परिस्थितीने अनेक कलाकारांच्या घरी चूल पेटेल की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी ज्याच्यांकडे क्षमता आहे, त्यांनी इतरांसाठी पुढे आले पाहिजे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Essentials were distributed to 111 needy artists by Pravin Tarde and team