'गुगल क्‍लासरूम'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन; महाराष्ट्र ठरलं देशातील पहिलं राज्य!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

कोविड-१९'चा संसर्ग वाढल्याने देशभरातील शाळा बंद करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम देशातील जवळपास ३२ कोटी विद्यार्थ्यांवर झाला. त्यातील २.३ कोटी विद्यार्थी हे महाराष्ट्रात आहेत.

पुणे : "शाळा कधी सुरू होणार, यापेक्षा शिक्षण कसे सुरू राहील, यावर आपण अधिक भर दिला पाहिजे. शिक्षणासाठी जी-सूट आणि गुगल क्‍लासरूमचे उद्‌घाटन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. आता भविष्याकडे न पाहता सध्या उपलब्ध तंत्रज्ञानाचा उपयोग इतर क्षेत्रासाठी कसा करता येईल, यावर भर दिला पाहिजे,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यात राज्य सरकारचं दुर्लक्ष होतंय; कुणी केला आरोप?​

राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी गुगल क्‍लासरूम प्रकल्पाचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरूवारी (ता.६) ऑनलाईनद्वारे झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गुगल इंडियाचे उपाध्यक्ष (सेल्स ऍण्ड ऑपरेशन्स) संजय गुप्ता आणि गुगल इंडियाच्या भारत आणि दक्षिण आशियाच्या शिक्षण विभागप्रमुख बानी पेंटल धवन या ऑनलाईनद्वारे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ठाकरे म्हणाले, "संपूर्ण जग ठप्प झाले असताना शिक्षण सुरू कसे ठेवायचे, असा प्रश्‍न आपल्यासमोरही आ वासून उभा राहिला होता. शाळा कधी सुरू होणार यावर खूप चर्चा झाली. परंतु आपण शाळा कधी सुरू होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरू राहील, यावर भर दिला. उद्याचे जग कसे असेल, शिक्षण कसे होईल, त्याची माध्यम कशी असतील, हे कोरोनाने आपल्याला आता करायला लावले.''

कोरोनानंतर कसं असणार कॉलेजमधील वातावरण? इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सांगितली त्यांची संकल्पना​

"कोविड-१९'चा संसर्ग वाढल्याने देशभरातील शाळा बंद करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम देशातील जवळपास ३२ कोटी विद्यार्थ्यांवर झाला. त्यातील २.३ कोटी विद्यार्थी हे महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शिक्षकांना घरात बसून शिकविता यावे, यासाठी 'टिचिंग फ्रॉम होम' ही संकल्पना गुगलमार्फत राबविण्यात येत आहे. ही सुविधा मराठीसह देशातील अन्य सात भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोरोनाच्या काळात ही सुविधा शिक्षकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. त्याद्वारे आतापर्यंत देशातील जवळपास चार लाखाहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

पुण्यातील ही मोठी धरणे दोन दिवसांत भरणार

गुगल क्‍लासरूम प्रशिक्षणासाठी अवघ्या २४ तासांत लाखांहून अधिक शिक्षकांची नोंद
"प्रगत शैक्षणिक राज्य बनविण्यासाठी राज्य सरकारने गुगलसमवेत सामजंस्य करार केला आहे. सध्या राज्यातील एक लाख नऊ हजार ९४२ शाळांमधील जवळपास सव्वा दोन कोटी विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक आशय पोचविण्याचे काम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) होत आहे. राज्य सरकारने गुगल क्‍लासरुमसंदर्भात प्रशिक्षणासाठी आव्हान केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात एक लाख ३० हजाराहून अधिक शिक्षकांनी नावनोंदणी केली. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे शक्‍य नाही, हे माहित आहे. परंतु शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत साधने पोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.''
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री 

कोरोनाचे संकट संपल्यानंतर शाळा भरतील 
"आतापर्यंत शाळा बंद असल्या तरी शाळा सुरू ठेवल्या आहेत. व्हर्च्युअल क्‍लासरूम म्हणजे संकट काळात शिक्षणाची संधी शोधणे होय. शिक्षकांकडून प्रत्यक्ष शिकताना विद्यार्थ्यांना मिळणारा आनंद वेगळाच असतो. त्याची तुलना व्हर्च्युअल क्‍लासरूमशी होऊ शकत नाही. कोरोनाचे संकट संपल्यानंतर शाळा पूर्वीप्रमाणे पुन्हा भरतील, असा मला विश्‍वास आहे.'' 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Classroom project for schools was inaugurated by CM Uddhav Thackeray