Vidhan Sabha 2019 : पुण्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी आमदाराचा भाजपात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

माजी आमदार बापू पठारे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुण्यात झटका बसला आहे.

पुणे : माजी आमदार बापू पठारे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुण्यात झटका बसला आहे. कॉंग्रेसबरोबरील समन्वय समितीमध्ये राष्ट्रवादीने त्यांची नुकतीच केलेली असताना, त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादीने त्यांना या पूर्वी नगरसेवकपद, महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि आमदारकी दिली होती. मात्र, सध्याच्या विधानसभेला त्यांना आमदारकीची उमेदवारी नाकारल्यामुळे पठारे यांनी भाजपची वाट धरली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षाचे नेते अजित पवार यांचे विश्‍वासू सहकारी अशी पठारे यांची ओळख होती. राष्ट्रवादीची पुण्यात सत्ता आल्यावर बापू यांना 2007 मध्ये नगरसेवक पदावरून महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची बढती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनंतर 2009 मध्ये त्यांना वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची संधी देण्यात आली. त्यामुळे पठारे आमदार झाले. मात्र, 2014 मध्ये त्यांचा भाजपचे उमेदवार जगदिश मुळीक यांनी पराभव केला.

अन् राज ठाकरे पुण्याच्या सभेत चुकले

सध्याच्या विधानसभा निवडणुकीत पठारे यांचे परंपरागत पक्षातंर्गत विरोधक सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिल्यामुळे पठारे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांची नियुक्ती समन्वयासाठी आघाडीच्या समितीतही नियुक्ती केली होती. पठारे यांचे पुतणे महेंद्र पठारे हे सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत. नगर रस्त्यावर चंदननगर, खराडी आदी भागात पठारे कार्यरत आहेत. प्रचाराच्या ऐन धामधुमीत पठारे यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार; राहुल गांधींचा फेक व्हिडीओ केला शेअर (व्हिडिओ)

विद्यमान आमदार जगदिश मुळीक यांनी या पक्षांतरासाठी पुढाकार घेतला. पठारे यांना ते स्वतः घेऊन मुंबईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "वर्षा' निवासस्थानावर गेले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EX mla Bapu Pathare enters in BJP