सासवडमध्ये `रॅपिड अँटिजेन टेस्ट`ची  सोय

श्रीकृष्ण नेवसे
Tuesday, 25 August 2020

-`रॅपिड अँटिजेन टेस्ट`ची सासवडलाच झाली सोय
-कितीही रुग्णांची तपासणी करण्याचा डाॅक्टरांचा विश्वास, जेजुरीतही लवकरच सोय

सासवड : सासवड शहर व परिसर पुण्याच्या अगदी जवळ असल्याने कोरोनाचा संसर्ग येथे वाढत आहे. त्यामुळे विलंबाने का होईना, पण.. `रॅपिड अँटिजेन टेस्ट` करणारी किट सासवड (ता. पुरंदर) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झाली आहेत. तसेच कालपासून स्वॅब घेऊन तपासणी सुरु झाली व सायंकाळी अहवालही प्राप्त झाले. याच पध्दतीने जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात अशीच तपासणी लवकरच सुरु होईल.

Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

या तपासणीच्या सोयबाबत पुरंदर तालुक्याच्या तहसिलदार रुपाली सरनौबत यांनी माहिती दिली. पुण्यात मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीत कोरोना तपासणीची जिल्ह्यात संख्या वाढविण्याचे आदेश दिले होते. आमदार संजय जगताप यांचाही पाठपुरावा होता. त्यातून जिल्ह्याधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांचा या भागात नुकताच दौरा झाला आणि दौऱयानंतर शासनाचे पाठबळ मिळाल्याने सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तमराव तापासे, डाॅ. किरण राऊत यांनी केवळ एक दिवसात वेगवान हालचाल करीत सासवड शहरात `रॅपिड अँटिजेन टेस्ट` सुरुही केली.

काल पहील्या दिवशी 51 जणांच्या घेतलेल्या स्वॅबचे अहवाल सायंकाळपर्यंत या रुग्णालयातील नव्या तपासणी सुविधेने दिले सुध्दा. डाॅ. राऊत `सकाळ` शी बोलताना म्हणाल., दररोज सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत संशयित रुग्णांची नोंदणी ग्रामीण रुग्णालयात आॅनलाइन होते. त्यानंतर सकाळी साडेअकरा ते संशयित रुग्ण जेवढे असतील, तोपर्यंत स्वॅब घेतले जातात. कितीही हाय रिस्क, लो रिस्कमधील किंवा इच्छुक संशयित रुग्ण आले तरी त्यांची तपासणी केली जाईलच. दरम्यान, `रॅपिड अँटिजेन टेस्ट`  पध्दतीने जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात अशीच तपासणी दोन - चार दिवसात सुरु होईल. त्यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ व मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या कामी हालचाली सुरु आहेत.

'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध

आता दिवस नव्हे.. अहवाल काही तासात- अगोदर सासवड व जेजुरी कोविड केअर सेंटरला, तसेच माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅप घेऊन ते पुणे किंवा बारामतीला तपासणीला जात होते. कधी दुसऱया वा तिसऱया दिवशी रिपोर्ट यायचे. त्यात रुग्णांवर उपचार करणे वा पुढील कार्यवाही करण्यात विलंब व्हायचा. आता मात्र सासवडलाच शासकीय यंत्रणेत तपासणी करुन काही तासात अहवाल मिळू लागल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. कदाचित तपासणीची संख्या वाढल्याने रुग्ण संख्याही वाढण्याची शक्यता असली तरी संसर्ग रोखण्यात या तपासणी वेगातूनच बऱयापैकी मदत होणार आहे., असे तज्ज्ञांनी यानिमित्ताने स्पष्ट केले. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facility of Rapid Antigen Test in Saswad