'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

भारताच्या पहिल्या बहुतरंगलांबी विद्युतचुंबकीय लहरी टिपणाऱ्या ऍस्ट्रोसॅट या उपग्रहाने ९.३ प्रकाशवर्ष दूर असलेली दीर्घिका टिपली आहे.

पुणे : महास्फोटानंतर (बिग बँग) ब्रह्मांडाचे अंधारयुग संपून प्रकाशाचे आगमन कसे झाले? याबद्दलचे महत्त्वपूर्ण पुरावे देणारे संशोधन आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी संस्थेच्या (आयुका) नेतृत्वात जगभरातील शास्रज्ञांनी केले आहे.

भारताच्या पहिल्या बहुतरंगलांबी विद्युतचुंबकीय लहरी टिपणाऱ्या ऍस्ट्रोसॅट या उपग्रहाने ९.३ प्रकाशवर्ष दूर असलेली दीर्घिका टिपली आहे. 'ए यु डी एफ एस ०१' नावाच्या या दीर्घिकेतून उच्चस्तरीय अतिनील किरण उत्सर्जित होतात. आयुकाचे सहयोगी प्रा. कनक साहा यांच्या नेतृत्वाखाली खगोल शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने हे संशोधन केले आहे.

बिनशर्त माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा नकार; 'मी माफी मागितली तर...'​

नेचर ॲस्ट्रॉनॉमी या शोधपत्रिकेत नुकतेच हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. भारतासह स्वित्झर्लंड, फ्रान्स, अमेरिका, जपान आणि नेदरलँड या देशातील वैज्ञानिकांचा यात सहभाग आहे. विश्वातील प्रकाशाच्या सर्वात पहिल्या स्रोताचा शोध लावणे अतिशय कठीण काम आहे. माझ्या सहकाऱ्यांनी असा महत्त्वपूर्ण शोध लावल्याचा अभिमान वाटत असल्याची भावना आयुकाचे संचालक प्रा. शोमक रायचौधरी यांनी व्यक्त केले.

संशोधनाचे महत्त्व : 
१) ब्रह्मांडात ताऱ्यांचा जन्म होणाऱ्या अशा काळातील अतिनील उत्सर्जनामध्ये हायड्रोजन अनुला प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन विभाजित करण्याची पुरेशी ऊर्जा असते. कॉस्मिक कृष्णयुगानंतर जन्मास येणाऱ्या आयनीभवनावर आधारित विश्वाची निर्मिती करण्यात या अतिनील किरणांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
२) ब्रम्हांडाची निर्मिती होताना ब्रम्हांडाची निर्मिती आणि विकास कसा झाला यावर प्रकाश पडेल.
३) प्रोट्रान्स, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्या प्रवाही मिश्रण असलेल्या ब्रह्माण्डचे रूपांतर तारे आणि दीर्घिका मध्ये कसे झाले, या विषयी माहिती मिळण्यास मदत होईल.

Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

संशोधनाची वैशिष्ट्ये : 
१) साहा यांच्या नेतृत्वात शास्रज्ञांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये इस्रोच्या ऍस्ट्रोसेटच्या साहाय्याने दोन तासांपेक्षा अधिक काळ निरीक्षण घेतले.
२) नासाच्या हबल दुर्बिणीलाही दीर्घिकेतील अतिनील किरणांचे उत्सर्जन टिपता आले नाही. कारण ते खूप क्षीण होते. 
३) उच्च ऊर्जा प्रकाशकण विश्वातील सर्व अडथळे पार करत पृथ्वीपर्यंत कसे पोचले हे एक रहस्यच आहे.

इस्रोच्या उपग्रहातील दुर्बिणीने दूरच्या दीर्घिकेतील प्रारणांची नोंद घेतली हे आंतरराष्ट्रीय समुदायाला पटवून देणे अवघड होते. कारण आम्ही सर्वात शक्तिशाली हबल दुर्बिणीचा वापर केला नव्हता. त्यामुळे इस्रोचा ऍस्ट्रोसॅट हा उपग्रह नवीन प्रवासाला सुरवात करेल.
- प्रा. कनक साहा, शास्रज्ञ, आयुका.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias Astrosat satellite has picked up a galaxy