पुणेकरांची माणुसकी मेली...उपचाराअभावी शेतकऱ्याने गमावला जीव

जनार्दन दांडगे
Wednesday, 5 August 2020

रुग्णालयात कोरोनाचे पेशंट अॅडमिट असल्याचे कारण पुढे करत पूर्व हवेलीमधील दोन बड्या रुग्णालयांनी अपघातामधील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे उपचाराअभावी जखमीपैकी एका चाळीस वर्षीय शेतकऱ्यास जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना

लोणी काळभोर (पुणे) : रुग्णालयात कोरोनाचे पेशंट अॅडमिट असल्याचे कारण पुढे करत पूर्व हवेलीमधील दोन बड्या रुग्णालयांनी अपघातामधील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे उपचाराअभावी जखमीपैकी एका चाळीस वर्षीय शेतकऱ्यास जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. ५) लोणी काळभोर (ता. हवेली) येथे घडली. विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पोचल्यावर तेथील आरोग्य कर्मचारी व व पोलिसांनी मृतदेहासोबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करत चार तासांहून अधिक काळ दरवाजातच पडून ठेवल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 

आॅनलाइनचा नवा फिटनेस फंडा

मणिलाल शिवाजी कोळपे (वय ४०, रा. बोरीभडक ता. दौंड) हे त्या उपचाराअभावी जीव गमवावे लागलेल्या दुर्देवी शेतकऱ्याचे नाव आहे. या अपघातामधील दुसरा जखमी अशोक शिवाजी नवले (वय ५०) यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातामधील गंभीर जखमींना दाखल करुन घेण्यास नकार देणाऱ्या पूर्व हवेलीमधील दोन्ही रुग्णालयाच्या प्रशासनाबरोबरच शेतकऱ्याच्या मृतदेहाची हेळसांड करणारे ससूनमधील पोलिस व ससून कर्मचाऱ्यांच्यांच्या विरोधात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. 

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला

लोणी काळभोर पोलिस व रुग्णवाहिका चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर बाजूकडून हडपसर बाजूकडे मणिलाल कोळपे हे मांजरी बुद्रुक येथे भेंडी विक्रीसाठी, तर अशोक नवले हे कंपनीत निघाले होते. दोघेही आपआपल्या मोटारसायकलवर होते. बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोघांच्याही मोटारसायकल फुरसुंगी फाट्य़ाजवळ आल्या. त्यावेळी पाठीमागुन आलेल्या डस्टर या मोटारीची दोघांच्याही मोटारसायकलला एकाचवेळी जोरदार धडक बसली. या अपघातात मणिलाल खोळपे व अशोक नवले हे दोघेही गंभीर जखमी झाले. 

यंदा डाळिंबाचा नाद करायचा नाय

दरम्यान, या अपघाताची खबर मिळताच स्थानिक लोकांनी उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेला बोलावून दोन्ही जखमींना उपचारासाठी पाठवून दिले. जखमींची अवस्था लक्षात घेऊन कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुणवाहिकेचा चालक अण्णा बालगुडे व त्याचा सहकारी वैभव कदम यांनी जखमींना लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयाय नेले. मात्र, कोरोनाचे पेशंट अॅडमिट असल्याचे कारण पुढे करत वरील रुग्णालयाच्या प्रशासनाने दोन्ही रुग्णांना दुसरीकडे नेण्याची विनंती केली. यावर अण्णा बालगुडे यांनी तत्काळ रुग्णवाहिका कोरेगाव मूळ हद्दीतील एका मोठ्या रुग्णालयात नेली. मात्र, तिथेही वरील उत्तर देऊन रुग्णालय प्रशासनाने पिटाळून लावले. 

या दरम्यान जखमींची अवस्था गंभीर होत चालल्याचे लक्षात येताच अण्णा बालगुडे यांनी रुग्णवाहिका ससून रुग्णालयाच्या दिशेने चालवली. रुग्णवाहिका हडपसर ओलांडत असतानाच मणिलाल कोळपे यांच्या हालचाली थांबल्याचे कदम यांच्या लक्षात आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच रुग्णवाहिका ससून रुग्णालयात आली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने कोळपे यांचा मृत्यू वाटेतच झाल्य़ाचे जाहीर केले. तर, नवले यास ससून रुग्णालयात दाखल करुन घेतले. तोपर्यंत सकाळचे आठ वाजले होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, कोळपे यांचा मृतदेह ससुन रुग्णालयाच्या दारातच तासभर पडूनही रुग्णालयातील कर्मचारी अथवा पोलिस कोळपे यांच्या मृतदेहास हात लावत नसल्याचे पाहून अण्णा बालगुडे व वैभव कदम यांनी ससून रुग्णालयाच्या काउंटरवर जाऊन मदतीची मागणी केली. मात्र, काउंटरवरील व्यक्तीने ड्युटी चेंज होत असल्याचे कारण पुढे करत थो़डा वेळ थांबा, असे सांगितले. त्यानंतर नऊ वाजण्याच्या सुमारास बालगुडे व कदम पुन्हा काउंटरवर गेले असता. तेथील व्यक्तीने पोलिसांना बोलवा, असे सांगितले. यावर बालगुडे ससून रुग्णालयातील पोलिसांना जाऊन भेटले. त्यांनी मृतदेहासोबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करत त्यांनीही पुढील हालचाली करण्यास नकार दिला. 

या दरम्यान, बालगुडे यांनी एका पोलिस कर्मचाऱ्यास मृतदेह हलविण्यासाठी मदत करण्याबत दिरगांई होत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबधित पोलिस कर्मचाऱ्याने १०० नंबरवर फोन करुन तक्रार करण्याची विनंती केली. अखेर बारा वाजण्याच्या सुमारास पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची तपासणी करून अधिकृतरित्या मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मृतदेहाची तपासणी पूर्ण झाल्यानंतरही ससूनमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मृतदेह डेडहाउसला घेऊन जाण्यास कसलीही मदत केली नाही. 

चौकशी करणार : आमदार पवार
याबाबत आमदार अशोक पवार म्हणाले की, अपघातामधील गंभीर जखमीस रुग्णालयांनी दाखल करुन न घेणे, ही बाब अतिशय गंभीर व धक्का देणारी आहे. दोन्ही रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला प्राण गमवावा लागलेला आहे. संबधित शेतकऱ्यावर वेळेत उपचार झाले असते, तर कदाचित शेतकऱ्याचे प्राण वाचूही शकले असते. ससूनमध्ये घडलेला प्रकारही चीड आणणारा आहे. या दोन्ही घटनांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यासाठी आग्रही राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer injured in accident dies due to lack of treatment