भारतीय रेडिओ खगोलशास्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप काळाच्या पडद्याआड

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

सिडनी जवळील पोट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (पॅराबोलीक) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

पुणे : भारतीय रेडिओ खगोलशास्राचे जनक मानले जाणारे डॉ. गोविंद स्वरूप (वय ९१) यांचं सोमवारी (ता.७) निधन झाले. काही दिवसांपूर्वी बरे वाटत नसल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण कल्याण परिसरात उभारण्यात आली होती. तसेच उटी येथील रेडिओ दुर्बिणीच्या यशानंतर नारायणगाव जवळील खोडद येथे जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण अर्थात जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) डॉ. स्वरूप यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात आली आहे.

कोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...

डॉ. स्वरुप यांनी अलाहाबाद येथून १९५० मध्ये विज्ञानातील मास्टर्स पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियातील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. सिडनी जवळील पोट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (पॅराबोलीक) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांना पद्मश्री, शांतिस्वरूप भटनागर, एच. के. फिरोदिया यांसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?​

डॉ. गोविंद स्वरूप यांचे काम एवढं मोठं आहे की, ते केवळ व्यक्ती किंवा शास्रज्ञ नव्हते, तर ते एक संस्था होते. त्यांचे खगोलशास्र आणि खगोलभौतिकीमधील काम जगमान्य होतं. म्हणून ते 'फेलो ऑफ रॉयल सोसायटी' होते. संस्थेच्या रूपाने ते नेहमीच आपल्यातच राहतील. खगोलशास्राच्या बाबतीत भारताची परिस्थिती अत्यंत वाईट अवस्थेत असतानाही त्यांनी जीएमआरटी सारखी जगात श्रेष्ठ अशी रेडिओ दुर्बीण विकसित केली. डॉ. स्वरूप यांचे जीवन भारतीय शास्त्रज्ञांसाठी एक प्रकारचा संदेश आहे. ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र होते. विज्ञाना संबंधित त्यांची एक वेगळी दृष्टी होती. त्यातूनच अनेक संस्था उभ्या राहिल्या. त्यांच्या जाण्याने वैज्ञानिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
-  डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्रज्ञ

'आयसर'सारख्या संस्थेची संकल्पना विकसित करण्यात डॉ. स्वरूप यांचा मोठा वाटा आहे. विज्ञानातील ते एक नेतृत्व होते. जीएमआरटी एक प्रकारे त्यांचे जिवंत स्मारक आहे. मूलभूत विज्ञानातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. आयसर परिवार नेहमी त्यांचा ऋणी राहील.
- डॉ. अरविंद नातू, ज्येष्ठ शास्रज्ञ.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father of Indian radio astronomy Dr Govind Swarup passes away