खाद्यतेलाच्या सुट्या विक्रीला चाप

खाद्यतेलाच्या सुट्या विक्रीला चाप
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २०: खाद्यतेलातील भेसळ, सुट्या स्वरूपातील विक्री, वापरलेल्या डब्यांचा पुनर्वापर आणि वारंवार तापवलेल्या तळणीच्या तेलाच्या वापरावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. खाद्यतेलाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या साखळीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.
सुटे आणि विनापॅकिंग खाद्यतेलाची विक्री हा गंभीर प्रकार असल्याचे ‘एफडीए’ने स्पष्ट केले. सुट्या तेलावर उत्पादनाची तारीख, बॅच क्रमांक, उत्पादकाची माहितीसह अन्य तपशील उपलब्ध नसल्याने प्रसंगी विषबाधा झाल्यास तेलाचा स्रोत शोधणे कठीण होते. त्यामुळे सुट्या स्वरूपात खाद्यतेल विक्री आणि खरेदी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खनिज तेल, वंगण, रंग अथवा रसायने साठविण्यासाठी वापरलेले डबे खाद्यतेलासाठी पुन्हा वापरण्यावरही ‘एफडीए’ने आक्षेप घेतला आहे. अशा डब्यांमुळे वापरल्याने तेलामध्ये दूषित घटक मिसळण्याचा धोका असतो. तसेच तळणीसाठी पुन्हा पुन्हा तेल तापवल्याने त्यात ट्रान्स फॅटीॲसिड, अल्डिहाइड्स आणि इतर हानिकारक संयुगे वाढतात. त्यामुळे उच्च रक्तदाब, यकृत व मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम तसेच हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले. वापरलेले तेल अधिकृत संकलकांकडे देणे बंधनकारक असून ते पुन्हा खाद्यसाखळीत येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
---
उल्लंघन केल्यास लाखोंचा दंड
असुरक्षित अन्नप्रकरणी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील कलम ५९ अंतर्गत सात वर्षांपासून आजन्म कारावासापर्यंतची शिक्षा आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. निकृष्ट अन्नासाठी पाच लाख, चुकीचे लेबल असलेल्या उत्पादनासाठी तीन लाख, परवाना किंवा नोंदणीशिवाय व्यवसाय केल्यास दहा लाख, तर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी दहा लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. आवश्यकतेनुसार संबंधितांचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाईही केली जाणार आहे.
---
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
पॅकबंद खाद्यतेल खरेदी करताना ग्राहकांनी लेबल, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख, सील आणि पॅकेजिंगची स्थिती तपासावी. गंजलेल्या अथवा पुनर्वापर केलेल्या डब्यातील तेल खरेदी करू नये. मल्टी-सोर्स खाद्यतेल घेताना लेबलवरील तेलांची नावे, त्यांचे प्रमाण आणि आवश्यक एगमार्क तपशील तपासण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com