एक 'मोकळंढाकळं ट्विट' बंद झालं! राज ठाकरेंचं ऋषी कपूर यांना मनसे अभिवादन!

Raj-Rishi
Raj-Rishi

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे ६७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली. काल हरहुन्नरी अभिनेता इरफान खान आणि आज ऋषी कपूर या दोघांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ऋषी कपूर यांच्या जाण्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील भावूक झाले आहेत. राज यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहताना एक पोस्ट लिहली असून ती सध्या सोशल मीडियात व्हायरल होऊ लागली आहे.

राज ठाकरे यांचे बॉलिवूड प्रेम सर्वज्ञात आहे. मात्र, ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांचा कौटुंबिक स्नेह होता. तसेच ऋषी कपूर यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा चाहता असल्याची भावनाही राज यांनी व्यक्त केली आहे.

राज यांनी पोस्टमध्ये लिहले आहे की, यश-अपयशाच्या चौकटी मोडून जे स्वतःला आवडेल, योग्य वाटेल तसं वागणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपट माध्यमावर कमालीचं प्रेम असणारे दोन नट एका मागोमाग हे जग सोडून गेले ह्यासारखी दुःखाची बाब नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला वहिला 'चॉकलेट बॉय' म्हणजे ऋषी कपूर. १९७३ साली बॉबी चित्रपटातून ऋषी कपूर ह्यांनी पदार्पण केलं. तो काळ बंडखोरीचा काळ होता. अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन, मर्दानी देखणा विनोद खन्ना, रसिकांना घायाळ करण्याची  अदाकारी असलेला  राजेश खन्ना, दमदार संवादफेकीचं कौशल्य लाभलेला शत्रुघ्न सिन्हा,  बलदंड धर्मेन्द्रजी आणि चतुरस्र संजीव कुमार ह्यांचा तो काळ होता. ह्या झंझावातात ऋषी कपूर ह्यांनी पदार्पण केलं. स्वप्नाळू पण बंडखोर तरुण-तरुणींचा ते नायक म्हणून त्यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं आणि टिकवलं.

ऋषी कपूर ह्यांनी अनेक चित्रपटात त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या आणि तेंव्हाच्या सुपरस्टार्ससोबत काम केलं, पण कॅमऱ्यासमोरचा सहज वावराचा कपूर घराण्याचा वारसा त्यांच्याकडे आला होता. त्यामुळे ते कधीच कुठल्याच सिनेमात दुय्यम वाटले नाहीत. त्यांचा अभिनय इतका सहज असे की, असं वाटायचं की जणू काही त्यांच्यासमोर कॅमेराच नाहीये. रंगभूमीवरील अभिनेत्याची ताकद आणि चित्रपट माध्यमात आवश्यक असलेली  सहजता ह्यांचा सुरेख संगम त्यांच्या अभिनयात आढळत असे. त्यामुळेच समकालीन दिग्गजांच्या स्पर्धेतही ते स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करून स्वत:चे  चित्रपट स्वबळावर यशस्वी करू शकले.

२००० च्या आसपास आधीच्या पिढीतील अभिनेते हळूहळू मागे पडत होते, पण ऋषी कपूर हे टिकून राहिले. विनोदी भूमिका करताना त्यांनी कधी अंगविक्षेप केले नाहीत आणि चरित्र भूमिका करताना कधी अतिनाट्यमयता येऊ दिली नाही. त्यांचं सिनेमांवरचं प्रेम तितकंच अबाधित राहिलं आणि त्यामुळेच २०२० मधील एखाद्या  तिशीतल्या नवोदित लेखकालासुद्धा सिनेमा लिहिताना ऋषीजीच डोळ्यासमोर दिसत राहिले.

ऋषी कपूर ह्यांच्याशी माझा कौटुंबिक स्नेह होता, आणि अर्थात त्यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो. सामाजिक, राजकीय आणि व्यवसायाशी संबंधित घडामोडींबाबत ते अतिशय मोकळेपणाने आणि समर्पक शब्दांत व्यक्त होत. त्यांचा स्वभाव त्यांच्या ‘ट्विट्स्’मधून दिसायचा. जे मनात तेच ओठावर आणि तेच ‘ट्विटर’वर असा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या एखाद्या ‘ट्वीट’वर कितीही वादंग माजलं तरी ते मागे हटायचे नाहीत. तसंच एखाद्या विषयावर भूमिका घ्यायला घाबरायचे नाहीत. 

- पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

चित्रपट कलेवर कमालीचं प्रेम असणारा आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ह्या अफाट ताकदीचा अभिनेत्याचं भारतीय चित्रपट सृष्टीतील स्थान अढळ राहील. ऋषी कपूर ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. अशा शब्दात राज ठाकरे यांनी अभिनेते ऋषी कपूर यांना शब्दपुष्पांजली वाहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com