चारित्र्यावर संशय घेत पती करायचा मारहाण; डॉक्‍टर महिलेनं संपवलं जीवन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

फिर्यादी यांच्या कुटुंबाची आणि मुलीच्या सासरकडील मंडळींशी काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यावेळीही पतीने त्यांना सासरी नेण्यास नकार दिला होता.

पुणे : चारित्र्यावर संशय घेत पतीकडून वारंवार होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिला डॉक्‍टरने भुलीचे इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना 27 नोव्हेंबरला वारजे माळवाडी येथे घडली. याप्रकरणी डॉक्‍टर पतीविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मनीषा रमेश कदम (वय 45) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्‍टरचे नाव आहे. याप्रकरणी पती रमेश नारायण कदम (रा. वेण्णा चौक, मेढा, सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मालन आलसे (वय 66, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. 

...फक्त लग्न मोडले म्हणून!​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आलसे यांची मुलगी मनीषा कदम या स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ होत्या, त्याचबरोबर तिचा पती रमेश कदम हा देखील स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ज्ञ आहे. दोघांचा 2004 मध्ये विवाह झाला होता. त्यांचे साताऱ्यातील मेंढ्यात रुग्णालय आहे. पती कदम हा दारूच्या नशेत मनीषा यांना मारहाण करीत असे. तसेच त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत शिवीगाळ, मारहाण करीत होता. त्याने मनीषा यांना काही महिन्यांपूर्वी माहेरी आणून सोडले होते. तेव्हापासून त्या माहेरी होत्या. फिर्यादी यांच्या कुटुंबाची आणि मुलीच्या सासरकडील मंडळींशी काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यावेळीही पतीने त्यांना सासरी नेण्यास नकार दिला होता. त्यांची मोठी मुलगी पतीसमवेत राहात होती, तर लहान मुलगी मनीषा यांच्यासमवेत राहात होती. 

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली​

पतीसमवेत सातत्याने होणाऱ्या भांडणामुळे त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीला भेटता येत नव्हते. या सगळ्या प्रकाराला त्या कंटाळल्या होत्या. त्यामुळे त्यांनी 27 नोव्हेंबर त्यांच्या राहत्या घरामध्ये भुलीचे इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस.एस.कथले करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fed up with her husband harassment doctor commits suicide by taking injection