Big Breaking : बारामती झाली कोरोनामुक्त; अखेरचा पेशंट घरी परतला!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

बारामती आता कोरोनामुक्त झाल्यामुळे 4 मे पासून बारामतीची लॉकडाऊनमधून मुक्तता करावी, अशी समाजाच्या सर्व घटकातील लोकांची मागणी आहे.

बारामती : शहरातील अखेरचा कोरोना रुग्ण गुरुवारी (ता.३०) रुग्णालयातून घरी परतल्यानंतर बारामती खऱ्या अर्थाने कोरोनामुक्त झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीत कोरोनाचा शेवटचा रुग्ण 14 एप्रिल रोजी सापडला होता. त्याच्यावर यशस्वी उपचार झाल्यानंतरच्या त्याच्या दोन्ही चाचण्या निगेटीव्ह आल्यानंतर आज संबंधित रुग्णाला घरी सोडण्यात आले. यामुळे आता बारामतीत एकही कोरोनाचा रुग्ण नसून कोणाचीही तपासणी किंवा अहवाल येणे बाकी नसल्याने आज बारामती शहर आणि तालुका कोरोनामुक्त झाला आहे. 

- केंद्राचे पथक म्हणते, बारामतीचे हे काम देशभरात व्हावे...

कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असला तरी त्यांना इतर व्याधींनीही ग्रासलेले होते. बारामतीत लॉकडाऊनची प्रक्रिया कडकपणे राबविण्यात आल्याने तसेच नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिल्याने बारामती कोरोनामुक्त झाले. 

बारामतीत कोरोनाचे रुग्ण नियमितपणे सापडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूत्रे हातात घेत प्रारंभी भीलवाडा आणि त्यानंतर बारामती पॅटर्न बारामतीत राबविला. कोणत्याही वस्तूसाठी लोकांनी घराबाहेर पडू नये या उद्देशाने ही यंत्रणा राबविली गेली होती. नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आज तरी बारामतीत कोरोनाचा एकही रुग्ण नसून कोणाचीही तपासणी शिल्लक नाही. आरोग्य विभागाने यात मोलाची कामगिरी बजावत हजारो लोकांच्या चाचण्या केल्या. 

- कामगार दिन स्पेशल : लॉकडाऊनमध्ये कामगारांपुढे आहे 'हेच' एकमेव ध्येय!

बारामती आता कोरोनामुक्त झाल्यामुळे 4 मे पासून बारामतीची लॉकडाऊनमधून मुक्तता करावी, अशी समाजाच्या सर्व घटकातील लोकांची मागणी आहे. गेल्या 40 दिवसांपासून बारामती बंद असल्याने आता ही स्थिती बदलून व्यापार व उद्योग पुन्हा पूर्ववत करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

- इंदापूर तालुक्यातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight with Coronavirus Baramati city now free from covid 19