esakal | जुन्नर : आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी

बोलून बातमी शोधा

crime
जुन्नर : आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी
sakal_logo
By
रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : वारूळवाडी ( ता. जुन्नर) प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना शिविगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे . ही घटना शनिवारी (ता. २४) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या प्रकरणी डॉ. आभा योगेंद्र त्रिपाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारूळवाडी येथील सतीश बनकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

दरम्यान, या बाबत सहायक पोलिस निरीक्षक ताटे म्हणाले डॉ. आभा त्रिपाठी या वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवेत आहेत. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बनकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात आला. त्याने डॉ. त्रिपाठी यांच्याकडे ई-पास देण्याची मागणी केली. या वेळी बाह्य रुग्ण विभागाची वेळ संपली असल्याने तुम्हाला ई-पास देता येणार नाही. या बाबत तुम्ही प्रभारी वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर त्यांना भेटा असे डॉ. त्रिपाठी यांनी बनकर यांना सांगितले. दरम्यान प्रभारी वैद्यकीय अधिकारी न आल्याने बनकर याने डॉ. त्रिपाठी व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. हॉस्पिटल तुमच्या बापाचे आहे काय असे म्हणून डॉ. त्रिपाठी यांना तुझे थोबाड फोडीन अशी धमकी दिली. या बाबत डॉ. त्रिपाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम ३५३ , ५०४, ५०६ महाराष्ट्र सेवा व्यक्ति आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृती व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध)अधिनियम २०१० चे कलम ४ प्रमाणे बनकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुणे - घरात आढळला डॉक्टरचा मृतदेह, बेशुद्ध बहिणीचाही उपचारावेळी मृत्यु

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तेरा गावे येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील डॉक्टर व कर्मचारी उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यातील ९७ प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक लसीकरण करण्याचे काम येथील डॉक्टरांनी केले आहे. या व्यतिरिक्त बालकांचे लसीकरण, गरोदर मातांची तपासणी, बाह्य रुग्ण तपासणी, कोरोना चाचणी व सर्व्हे आदी कामे स्वतःचा जीव धोक्यात घालून येथील डॉक्टर व कर्मचारी मागील वर्षभर करत आहेत. या केंद्रा अंतर्गत गावे कोरोना हॉटस्पॉट झाली आहेत. डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी नागरिकांनी सौजन्याने वागणे आवश्यक आहे. -पृथ्वीराज ताटे (सहायक पोलिस निरीक्षक)

हेही वाचा: जुन्नर नगर पालिकेच्या कोरोना योद्ध्यांची कामगिरी प्रशंसनीय