सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील प्रकल्पांतर्गतच्या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. सीरममध्ये कोविड लशीचे उत्पादन घेतले जात असल्याने संबंधीत घटना ही अपघात आहे की घातपात याबाबतही दिवसभर चर्चा होती. या घटनेच्या पार्श्वभुमीवर गुरुवारी दुपारपासूनच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सीरममधील आगीच्या ठिकाणी हजेरी लावली होती. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन आगीच्या ठिकाणाची माहिती घेतली.
पुणे : सीरममध्ये गुरुवारी लागलेल्या आगीच्या घटनेचा हडपसर पोलिसांकडून पंचनामा करण्यास सुरवात झाली आहे. आगीची घटना मोठी असल्याने आणखी एक दिवस पंचनामा सुरू राहणार आहे. या घटनेप्रकरणी अद्याप कोणाविरुद्धही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र, पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील प्रकल्पांतर्गतच्या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. सीरममध्ये कोविड लशीचे उत्पादन घेतले जात असल्याने संबंधीत घटना ही अपघात आहे की घातपात याबाबतही दिवसभर चर्चा होती. या घटनेच्या पार्श्वभुमीवर गुरुवारी दुपारपासूनच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सीरममधील आगीच्या ठिकाणी हजेरी लावली होती. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन आगीच्या ठिकाणाची माहिती घेतली.
- Breaking: शिवजयंतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली महत्वाची घोषणा
दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, शुक्रवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम दिवसभर घटनास्थळी होते. हडपसर पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच पंचनाम्याला सुरवात केली. आगीच्या ठिकाणी फर्निचर, वातानुकूलित यंत्रणेच्या वस्तू, इलेक्ट्रीकल वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पंचनाम्याचे काम शनिवारीही होणार आहे. हडपसर पोलिसांनी या घटनेची सध्या अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तसेच या घटनेचा पंचनामा पूर्ण झाल्यानंतर तपास करण्यात येणार आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
''सीरममधील आगीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांबरोबरच पुणे अग्निशामक दल व एमआयडीसी अग्निशामक दलानेही पाहणी केली आहे. त्यानंतर संयुक्त अहवाल तयार केला जाईल. अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होईल.''
- नम्रता पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ पाच.
- महत्त्वाची बातमी: सरळसेवा भरतीचा मार्ग मोकळा; कंपन्यांच्या नावावर शिक्कामोर्तब