कृषी विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिली फेरी 10 डिसेंबरपासून होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

- महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची माहिती
- अभ्यासक्रमाचे वर्ग नव्या वर्षात होणार सुरू

पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची स्थगित केलेली प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत प्रवेशाची पहिली फेरी 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चार फेऱ्या असणार आहेत. तर प्रवेश प्रक्रियेनंतर नव्या वर्षापासून म्हणजेच एक जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने दिली आहे. 

 

राज्यात चार कृषी विद्यापीठांमध्ये दहा विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमाची 38 कार्यरत आहेत. यापैकी 33 शासकीय महाविद्यालये आणि पाच अनुदानित महाविद्यालये आहेत. कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा असून या महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश क्षमता एक हजार 335 आहे.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

राज्यातील या कृषी विद्यापीठांतर्गत 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिल्याने ही प्रवेश प्रक्रिया स्थगित झाली होती. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. एम.एस्सी (कृषी), एम.एस (उद्यानविद्या), एम.एस्सी. (वनशास्त्र), एम.एस्सी (मस्य विज्ञान), एम.टेक. (अन्न तंत्रज्ञान), एम.एस्सी. (कृषी जैव तंत्रज्ञान), एम. टेक( कृषी अभियांत्रिकी), एम.एस्सी (गृहविज्ञान), एमबीए (कृषी) आणि एम.एस्सी (काढणी पश्‍चात व्यवस्थापन) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत.

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू

कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक :
तपशील : कालावधी
- पहिल्या प्रवेश फेरीची यादी प्रसिद्धी : 10 डिसेंबर
- रिपोटिंगचा कालावधी : 11 ते 14 डिसेंबर
- दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी प्रसिद्धी : 16 डिसेंबर
- रिपोटिंगचा कालावधी : 17 ते 19 डिसेंबर
- तिसऱ्या फेरीची यादी प्रसिद्धी : 21 डिसेंबर
- रिपोर्टिंगचा कालावधी : 22 ते 24 डिसेंबर
- रिक्त जागांच्या यादीची प्रसिद्धी : 26 डिसेंबर
- चौथी प्रवेश फेरी : 28 ते 30 डिसेंबर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first round of pg courses under the Agriculture University will start from December 10