Pune : हॉटेलमधील खाणे महागणार ! चालकांकडून खाद्यपदार्थाच्या दरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॉटेलमधील खाणे महागणार ! चालकांकडून खाद्यपदार्थाच्या दरात वाढ

हॉटेलमधील खाणे महागणार ! चालकांकडून खाद्यपदार्थाच्या दरात वाढ

पुणे : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची झळ सोसत असलेल्या पुणेकर खवय्यांना आता हॉटेलात आवडीच्या पदार्थावर ताव मारणे देखील महागात पडत आहे. वाढत्या महागार्इचे कारण पुढे करीत शहरातील बऱ्याच हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनी खाद्यपदार्थांचे दर वाढवले आहेत.

हेही वाचा: कुलगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई; पाच दहशतवाद्यांचा खात्मा

कोरोनाची छळ सोसून पुन्हा उभारी घेत असलेल्या या क्षेत्रातील घटलेला नफा पुन्हा परत मिळावा, तसेच व्यवस्थापनातील तूट कमी व्हावी, या आशाने काही हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत पाच ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शहरातील खाणावळी व स्नॅक्सचे पदार्थ विकणारे देखील त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे आधीच वाढत्या महागार्इ वैतागलेल्या सर्वसामान्यांना आता हॉटेल देखील महाग झाले आहे. जिभेची चव पूर्ण करीत पोटाची भूक भागविणे आता खवय्यांच्या खिशाला चाट लावणार असल्याचे त्यातून स्पष्ट होते.

कोरोनाकाळात अनेक महिने हॉटेल केवळ पार्सलपुरते सुरू होते. केवळ पार्सल परवडत असल्याने कोरोनाच्या दोन्ही लाटेत सुमारे ७० टक्के हॉटेल बंदच होती. तर हॉटेल सुरू ठेवणे परवडत नाही म्हणून कोरोना सुरू झाल्यापासून जवळपास शहरातील २० टक्के हॉटेल ही कायमस्वरूपी बंद झाली आहेत. कोरोना सुरू झाल्यापासून या क्षेत्राला देखील मोठी छळ सोसावी लागली आहे. मात्र आता त्यांना देखील हळूहळू अच्छे दिन येत आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची सरासरी टिकून असलेल्या व्यावसायिकांनी त्यांचे मेन्यू कार्ड आणखी गरम केले आहे. तर ज्या हॉटेलांचा रोजचा धंदा अद्याप जेमतेम किंवा समाधानकारक आहे त्यांनी आहे तेच दर ठेवण्याला पसंती दिल्याचे चित्र शहरात आहे.

खाद्यपदार्थांचे दर वाढण्याचे कारणे :

  • झपाट्याने झालेली इंधन दरवाढ

  • तेलासह किराणा मालाच्या वाढलेल्या किमती

  • कोरोना काळात सोसावी लागलेली झळ

  • हॉटेल व्यवस्थापनात वाढलेले खर्च

हेही वाचा: दहावीच्या परीक्षेसाठी उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात

"लॉकडाऊनमधून बाहेर पडत आत्ताकुठे हॉटेल व्यवसाय सुरळीत होवू लागला आहे. त्यात जर खाद्यपदार्थ्याचे दर वाढवले तर ग्राहक येणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे दर वाढले तर त्याचा व्यवसायावर परिमाण होणार आहे. वाढत्या महागार्इमुळे हॉटेलसाठी लागणाऱ्या वस्तू देखील महागल्या आहेत. त्यामुळे काही व्यावसायिकांनी किमती वाढवल्या असतील. मात्र त्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त नाही."

- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलियर्स असोसिएशन

"मी नियमित जात असलेल्या हॉटेलात खाद्यपदार्थांच्या किमती सुमारे १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. महिनाभरापूर्वी ही वाढ झाली आहे. महागार्इमुळे दरवाढ केल्याचे हॉटेलच्या मालकाने सांगितले. इंधन दरवाढीमुळे आधीच सर्वच वस्तू व सेवा महागल्या आहेत. त्यात आता हॉटेल क्षेत्राची भर पडली. त्यामुळे या खर्चाची देखील आता कपात करावी लागणार आहे."

- सनी मुसळे, नोकरदार

loading image
go to top