खडकवासला सुरू, सिंहगड मात्र बंदच; प्रशासनाची दुटप्पी भूमिका

निलेश बोरुडे
Sunday, 29 November 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी 7 जून 2020  रोजी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, गड किल्ले व धरणांचा परिसर पर्यटकांसाठी बंद राहील असे आदेश जारी केले.

किरकटवाडी (पुणे): सिंहगड किल्ला, खडकवासला व पानशेत धरण पर्यटकांसाठी बंद राहील असे आदेश असताना तोंडी परवानगिने पोलीस प्रशासनाने खडकवासला धरण चौपाटीवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी दिली आहे मात्र दुसरीकडे सिंहगडावरील हातावर पोट असणारे विक्रेते मात्र परवानगी नसल्याने हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे एकाच आदेशाबाबत प्रशासनाची दुटप्पी भूमिका समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी 7 जून 2020  रोजी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे,गड किल्ले व धरणांचा परिसर पर्यटकांसाठी बंद राहील असे आदेश जारी केले. याबाबत मागे काही दिवसांपूर्वी 'सकाळ'च्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता सदर आदेश अद्याप अस्तित्वात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. 
 
या आदेशाची वन विभागाकडून कडक अंमलबजावणी सुरू असून सिंहगडावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना व पर्यटकांना अद्यापही परवानगी दिली जात नाही. त्यामुळे सिंहगडावरील रहिवाशांच्या उपजीविकेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. खडकवासला धरणावर मात्र पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांचा आदेश नसताना खाद्यपदार्थ विक्रेत्यांना हातगाड्या लावण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आम्हाला पोट नाही का? असा संतप्त सवाल सिंहगडावरील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

पुण्यात आजपासून 4 दिवस 'ड्राय डे'; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

"नऊ महिने झाले सिंहगड बंद आहे. आम्हाला चहा, भजी सुद्धा विकू दिले जात नाहीत. पर्यटक आले तरी त्यांना हाकलून लावले जाते. खडकवासला चौपाटीवर जशी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी दिली तशी आम्हालाही देण्यात यावी. आमच्यावर अन्याय का?" अमोल पढेर,मा.सरपंच, रहिवासी, सिंहगड.

"जिल्हाधिकार्‍यांचा आदेश असल्याने सिंहगडावर पर्यटकांना व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी दिलेली नाही.जिल्ह्यातील वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या कोणत्याच पर्यटन स्थळाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही." दिपक पवार, भांबुर्डा वन परिक्षेत्र अधिकारी.

Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खडकवासला चौपाटी सुरू करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेतली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या तोंडी आदेशाने खडकवासला धरण चौपाटीवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नियमांचे पालन करून हातगाड्या लावण्यास परवानगी दिलेली आहे." सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस स्टेशन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food vendors allowed at khadakwasla climbing but ban on Sinhagad road