esakal | दिग्गज क्रिकेटपटू, समालोचक डिन जोन्स यांचं निधन; 'आयपीएल'ला बसला धक्का!
sakal

बोलून बातमी शोधा

Dean_Jones

भारतीय भूमी ही डिन जोन्ससाठी जवळची होती. 1987 मध्ये भारतात झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील विजेत्या ऑस्ट्रेलिया संघात त्यांचा समावेश होता.

दिग्गज क्रिकेटपटू, समालोचक डिन जोन्स यांचं निधन; 'आयपीएल'ला बसला धक्का!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक डिन जोन्स (वय 59) यांचे गुरुवारी (ता.24) मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. आयपीएलच्या समालोचनासाठी ते मुंबईत होते. कालच्या सामन्यातही त्यांनी समालोचन केले होते. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते समालोचक झाले होते. अनेक वर्षांपासून त्यांनी या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या अचानक निधनाने क्रिकेट विश्‍व तसेच आयपीएललाही धक्का बसला आहे. 

जाणून घ्या आयपीएलमागच्या आर्थिक उलाढाली...​

गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास न्याहरी केल्यानंतर दिवसाच्या ब्रिफिंग नियोजानतही ते सहभागी झाले. त्यानंतर लॉबीमध्ये आपल्या सहकारी समालोचकांशी बोलत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच ते खाली कोसळले. लगेचच त्यांना हरकिसन दास रुग्णालयात नेण्यात आले; परंतु त्या अगोदच त्याचे निधन झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. 

आक्रमक शैलीचे फलंदाज 
डिन जोन्स हे आक्रमक शैलीचे फलंदाज म्हणून प्रसिद्ध होते. 1984 ते 1994 या काळात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. 52 कसोटीत 11 शतकांसह त्यांनी 3631 धावा केल्या. याशिवाय 164 एकदिवसीय सामन्यात त्यांनी 6068 धावा फटकावलेल्या आहेत. 

'खो-खो'च्या राष्ट्रीय खेळाडुवर केशकर्तनालय चालवण्याची वेळ

भारताशी नाते 
भारतीय भूमी ही डिन जोन्ससाठी जवळची होती. 1987 मध्ये भारतात झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील विजेत्या ऑस्ट्रेलिया संघात त्यांचा समावेश होता. तसेच 1986 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारत-ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक 'टाय' कसोटीतील जोन्स यांची 210 धावांची खेळी अविस्मरणीय ठरली होती. ऑक्‍टोबर हीटमध्ये खेळताना त्यांनी मैदानावर ओकारी केल्या होत्या, परंतु औषध घेत खेळी कायम ठेवत द्विशतक केले होते. दुर्दैवाने त्यांचा मृत्यूही भारतातच झाला. 

समालोचनातही त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. 'प्रोफेसर डिनो' या नावाने ते विस्लेषण करत. क्रिकेटचा सदिच्छा दूत म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. 

भारतीय कबड्डी संघात खेळणार कोकणचा शुभम शिंदे​

क्रिकेटविश्वातील दिग्गजांनी वाहिली आदरांजली 
आपल्या सहकारी समालोचकाचे असे निधन होणे धक्कादायकच आहे, सकाळी ते व्यवस्थित होते. दोन दिवसांपूर्वी मी त्यांच्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर चर्चाही केली होती, सर्व काही सुरळीत सुरू होते...माझा विश्‍वासच बसत नाही. 
- इरफान पठाण, माजी क्रिकेपटू आणि जोन्स यांच्यासह आयपीएलचे समालोचक 

समकालीन क्रिकेटपटू आणि चांगला मित्र डिन जोन्सचे या वयात निधन होणे धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. 
- रवी शास्त्री, टीम इंडियाचे प्रशिक्षक 

डिन जोन्स यांचे असे जाणे फारच धक्कादायक आहे. एका चांगल्या व्यक्तिमत्वाचे अकाली निधन झाले. माझ्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 
- सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू 

डिन जोन्स यांचे निधन झाले यावर अजूनही विश्‍वास बसत नाही, माझे ते आवडते समालोचक होते, माझ्या बहुतेक ऐतिहासित खेळीच्या वेळी ते समालोचन करत होते. 
- वीरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू 

डिन जोन्स यांच्या अकाली आणि अचानक झालेल्या निधनाचा धक्का बसला आहे. 
- विराट कोहली, टीम इंडियाचा कर्णधार