ठाकरे सरकार पळपुटे, पिता-पुत्राला बॉलिवूड, पबची चिंता; आशिष शेलार यांची टीका 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

पुणे विभागातील पदवीधर संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शेलार शनिवारी पुण्यात आले होते. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संग्रामसिंह देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

पुणे : राज्यातील ठाकरे सरकारने वर्षभरामध्ये जनतेची दयनीय अवस्था केली आहे. राज्यात इतके पळपुटे आणि पराधीन सरकार कधी पाहिले नव्हते. मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची चिंता जास्त आहे आणि त्यांचे सुपूत्र हे पब- बारची चिंता करतात, अशी टीका माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली. 

पुणे विभागातील पदवीधर संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शेलार शनिवारी पुण्यात आले होते. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संग्रामसिंह देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. शेलार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने जनतेचे कोणतेही प्रश्‍न सोडवले नाहीत. मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या शुल्क वाढीचा प्रश्‍न सोडवला नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किंवा कोरोनाच्या काळात नागरिकांना आर्थिक पॅकेज दिले नाही. 

राज्यात रेस्टॉरंट, पब-बार नियम घालून उघडू शकतात तर मंदिरे का उघडली जाऊ शकत नाहीत, असा आमचा मंदिर सुरू करण्याबाबत मुद्दा होता. सरकारने सर्व घटकांसोबत चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशी भाजपची भूमिका आहे. या शाळा आहेत की छळवणुकीचे केंद्र आहेत, असा सवाल त्यांनी केला. 

आमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर...; मनसेच्या रुपाली पाटील यांना जीवे...

"ते' वक्‍तव्य तेवढ्यापुरतेच... 
शेलार यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावा, असे वक्‍तव्य केले होते. या संदर्भात विचारले असता "ते वक्‍तव्य कालच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात झालेल्या भाषणातील टिप्पणीच्या आधारावर होते. या पलीकडे काहीच नाही. समाजातील सर्व महिलांनाच सर्वोच्च स्थान मिळाले पाहिजे. मी लहान कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये काम करू. पण जेव्हा येईल तेव्हा,' असे त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यापालांना वेळेची मर्यादा देणे योग्य नाही 
विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी राज्यपालांनी 21 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करावी, असे सरकारने म्हटले होते. त्याबाबत शेलार म्हणाले, राज्यपालांना वेळेची मर्यादा देणे योग्य नाही. मुळातच ही पद्धत कोठली. कायद्यात असे अभिप्रेत नाही. राज्यपाल पदाला सन्मान देणार आहोत का, असा विचार सरकारमधील राजकीय पक्षांनी करावा. 

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता गृहित धरून पुण्यात महापालिकेने तयारी करावी
 

कोरोनावर नियंत्रण महापालिकेमुळेच : मुळीक 
महापालिकेने कोरोना उपाययोजनांवर तीनशे कोटींहून अधिक खर्च केला आहे. परंतु राज्य सरकारने तीन कोटींपेक्षा अधिक मदत केली नाही, असा आरोप शहराध्यक्ष मुळीक यांनी केला. शहरात कोरोनावर नियंत्रण हे महापालिकेमुळेच झाले आहे. सरकारने केवळ जम्बो रुग्णालयासाठी थोडीशी भागीदारी केली. महापालिकेने रुग्णांची संख्या लपविण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे मुळीक यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former education minister Ashish Shelar criticized Uddhav and Aditya Thackeray